सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे 
महाराष्ट्र

संविधानाने नागरिकांना मानवी मूल्य आणि प्रतिष्ठा दिली; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे प्रतिपादन

आपले संविधान कालसुसंगत राहील का, अशी टीका आपल्या संविधानावर होते. मात्र, आज ७५ वर्षानंतरही भारतीय संविधान कालसुसंगत असून ते आपल्याला मार्गदर्शक आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : आपले संविधान कालसुसंगत राहील का, अशी टीका आपल्या संविधानावर होते. मात्र, आज ७५ वर्षानंतरही भारतीय संविधान कालसुसंगत असून ते आपल्याला मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांना मानवी मूल्य आणि प्रतिष्ठा दिली असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी यावेळी केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीने संविधान महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी रुक्मिणी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त डॉ.अमरदीप कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, ऍड.एस.के.कदम, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

न्यायमूर्ती प्रसन्न वराळे म्हणाले, संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा आत्मा असून उद्देशिकेचा प्रत्येक शब्द महत्त्वपूर्ण आहे. उद्देशिकेचे महत्त्व अनेक विचारवंतांनी सांगितलेले आहे. या उद्देशिकेचा सार्थ गौरव प्रख्यात प्राध्यापक अर्नेस्ट यांनी आपल्या 'फिलासॉफी ऑफ पॉलिटिकल सायन्स' हा ग्रंथात केला आहे. या ग्रंथाची अर्पणपत्रिका त्यांनी भारतीय संविधानात दिलेली आहे. आपण सगळे नेहमी संविधानाच्या ज्या प्राविधानाविषयी कायम बोलत असतो ती म्हणजे, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि राज्याची मार्गदर्शक तत्त्वे होय. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा हेही प्रावधान केले गेले की, मूलभूत अधिकारांची रक्षा आणि जतन करणे ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी राहील.

ज्या काही मोजक्या संस्था आपल्या संख्यात्मक वाढीसह गुणात्मक वाढीचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात यात एमजीएम संस्थेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भगवान बुद्धांचा ‘अत्त दीप भव’ हा विचार घेऊन आपली संस्था कार्यरत आहे. संस्थेने पारंपरिक उपक्रमांसह विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावेत म्हणून कालसुसंगत असे अभ्यासक्रम आणि उपक्रम सुरू केले असल्याचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी यावेळी सांगितले.

आजच्या कार्यक्रमाची सुरूवात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली. एमजीएम स्कूलच्या विद्यार्थ्यानी संविधान डायरी आणि प्रदर्शन येथे भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिव कदम यांनी केले तर आभार प्रा. झरताब अंसारी यांनी मानले.

‘संविधानाचा अधिक्षेप करण्याची ताकद कोणात नाही’

या संविधानाचा अधिक्षेप करण्याची ताकद कोणात नाही. मागे इतिहासात आपण पाहिले, जेव्हा कोणी सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न केला किंवा सत्तेचा वापर गैरमार्गाने करण्याचा प्रयत्न केला किंवा संविधानात बदल करण्याचा प्रयत्न केला अशा सर्व शक्तींना या देशातील नागरिकांनी ज्यांनी हे संविधान स्वतःला समर्पित केलेले आहे. त्या सर्व जबाबदार नागरिकांनी अशा सर्व शक्तींना सत्तेतून बाजूला केलेले आहे.

बॅरिस्टर राजा एस. भोसले चेअर ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्चची स्थापना

एमजीएम विद्यापीठात ‘बॅरिस्टर राजा एस भोसले चेअर ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च’चे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. भारतातील बदलत्या कायदेशीर व्यवस्थेच्या अनुषंगाने सखोल संशोधन आणि धोरण निर्मितीला चालना देण्यासाठी ही चेअर महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या चेअरचा उद्देश विविध कायदेशीर क्षेत्रांमध्ये संशोधन करणे, सार्वजनिक धोरणांवर प्रभाव टाकणे, आणि संशोधक व विधी अभ्यासकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे हा आहे. संविधानिक कायदा, मानवाधिकार, पर्यावरण कायदे आणि बौद्धिक संपदा कायदा या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत