महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात मोठ्या संधी!आयटीआयचा चेहरामोहरा बदलणार -मंगलप्रभात लोढा

मंदार पारकर

महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. फार मोठ्या संधीही आहेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही करता येणार आहे. त्यासाठी आमचा जोमाने प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे महिला व बालविकास, पर्यटन तसेच कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील ४२८ आयटीआयचा चेहरामोहराच बदलण्यात येणार आहे. त्यासाठी १२ हजार कोटींचा निधी खर्च करण्यात येईल. तसेच ५०० ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्र उघडण्यात येणार आहेत. मुंबईत देखील मुंबई महापालिकेच्या सहकार्याने १०० कौशल्य विकास केंद्र उघडण्यात येणार असून येत्या जून महिन्यापासून ती कार्यान्वित होतील. या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविणे तसेच उद्योजक घडविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

दैनिक 'नवशक्ती' तसेच 'फ्री प्रेस जर्नल'च्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी दिलेल्या विशेष मुलाखतीत मंगलप्रभात लोढा बोलत होते. महाराष्ट्राला साडेसातशे किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. साडेतीनशे गडकिल्ले महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राला पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे सांगून मंगलप्रभात लोढा म्हणाले, आज एमटीडीसीकडे स्वत:ची १ लाख कोटींची मालमत्ता आहे. पण हा विभाग इतकी वर्षे तोट्यात होता. आज या विभागाला ९ कोटींचा फायदा झाला आहे. पुढच्या वर्षी हाच फायदा २५ कोटींपर्यंत जाणार आहे. पर्यटन क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर त्यासाठी रस्ते व इतर पायाभूत सुविधांचा देखील विकास झाला पाहिजे. कोकणात देखील पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. त्यांचाही आम्ही विकास करत आहोत. खासगी क्षेत्राला देखील आम्ही यात सहभागी करत आहोत. दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर मुंबई फेस्टीव्हल देखील आयोजित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

कौशल्य विकासच्या माध्यमातून राज्यातील ४२८ आयटीआयचा चेहरामोहराच बदलण्यात येणार आहे. त्यासाठी १२ हजार कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. आयटीआय संस्थांच्या इमारतींचा कायापालट करण्यात येईल. व्हर्च्युअल क्लासरूम देखील उभारण्यात येतील. आज आम्ही विद्यार्थ्यांकडूनच त्यांना कोणते कोर्सेस शिकायचे आहेत याची माहिती मागितली होती. १ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी त्याबाबत माहिती दिली.

राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाड्याही स्मार्ट करण्यात येणार आहेत. दरवर्षी तीन ते चार हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्यास सुरुवात झाली असल्याचेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

५०० ग्रामपंचायतींना कौशल्य विकास केंद्र

आम्ही ५०० ग्रामपंचायतींना कौशल्य विकास केंद्र उघडून देणार आहोत. या केंद्रांमध्ये उद्योजक होण्यासाठी लागणारे प्रशिक्षण देण्यात येईल. एखादा युवक हा शेतात काम करत असतो. त्याला देखील सोयीचे व्हावे म्हणून कोर्सेसच्या वेळा देखील त्याच्या सोयीने ठरविण्यात येतील. एखाद्याला दिवसाला फक्त दोन तास शिकायचे असेल तर ते देखील शक्य होणार असल्याचे मंगलप्रभात लोढा म्हणाले. ग्रामीण भागाप्रमाणे शहरातही ही केंद्र उघडण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या सहकार्याने शंभर कौशल्य विकास केंद्र उघडण्यात येणार आहेत. येत्या जून महिन्यापासून ती कार्यान्वित होतील, असेही ते म्हणाले.

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती