महाराष्ट्र

मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका, १७ महत्त्वाचे निर्णय; वृद्ध कलावंतांना सरसकट ५ हजार मानधन

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आणि आठवड्यात तीनवेळा बैठका घेऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शनिवारीही केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि १७ महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये अ, ब, क असे वर्ग रद्द करून वृद्ध कलावंतांना सरसकट ५ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली. वन विंडो परवानगी, चित्रपट क्षेत्राला चालना देण्यासाठी शासकीय, निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरणाचा मार्ग मोकळा करण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अ, ब, क वर्ग रद्द करून सर्व वृद्ध कलावंतांना ५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. चित्रपटाला चालना देण्यासाठी आता कोणत्याही जागेत शूटिंग करता येणार आहे. यासोबतच वन विंडो परवानग्या देण्यात येतील आणि संस्कृत, तेलुगु आणि बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यातून एक भारत श्रेष्ठ भारत अन्वये बंगाली, तेलुगु, संस्कृती साहित्य उपलब्ध होणार आहे. यासोबतच तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठी ५० कोटी भागभांडवल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच ऑटो रिक्षा, टॅक्सीचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचाही शनिवारच्या बैठकीत निर्णय झाला असून, त्यासाठी ५० कोटी अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

आठवड्यात ३ बैठका, ६२ महत्त्वाचे निर्णय

राज्य सरकारने एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या २ बैठकांमध्ये ४५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते, तर शनिवारी झालेल्या बैठकीत आणखी १७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारने अवघ्या आठवडाभरात ६२ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

पोलीस दलात आता एआयचा वापर होणार

सरकारने राज्य पोलीस दलात एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यास मान्यता दिली. यासोबतच संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्यासाठी सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे होणार उच्चाटन

हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅनहोलकडून मशीनहोलकडे ही योजना राबविण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळातील निर्णय

  • राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी

  • तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार

  • मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास, दंडही वाढविला

  • १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता

  • संस्कृत, तेलुगु, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करणार

  • शासकीय, निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरण

  • विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ, ५० कोटी भागभांडवल

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ

  • हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार, रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’कडे योजना

  • संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. त्यासाठी सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार

  • राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

  • ऑटोरिक्षा, टॅक्सीचालकांसाठी कल्याणकारी मंडळ, त्यासाठी ५० कोटी अनुदान

  • भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप

  • संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार

  • वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन

  • राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर

  • श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!