महाराष्ट्र

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ : दोन शिवसैनिकांत होणार लढत; एकूण ११ उमेदवार रिंगणात, महायुतीची ताकद एकवटली

बुलढाणा जिल्हा हे विदर्भाचे प्रवेशद्वार मानले जाते. या मतदारसंघात २९ लाख ५५ हजार मतदार असून इथे यावेळी शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गट शिवसेना या दोन्हीचे उमेदवार परस्परांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत.

Swapnil S

अविनाश पाठक

विदर्भ खान्देश आणि मराठवाडा यांच्या सीमारेषेवर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद या सहा विधानसभा क्षेत्रांचा मिळून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे. बुलढाणा जिल्हा हे विदर्भाचे प्रवेशद्वार मानले जाते. या मतदारसंघात २९ लाख ५५ हजार मतदार असून इथे यावेळी शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गट शिवसेना या दोन्हीचे उमेदवार परस्परांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत.

या मतदारसंघात शिंदे गटासोबत असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा खासदार होण्यासाठी रिंगणात उतरलेले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाने नरेंद्र खेडेकर यांना रिंगणात उतरवले आहे. शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि बसपाचेही उमेदवार मैदानात आहेत. हे बघता येथे पंचरंगी सामना होणार की काय, अशी शक्यता बोलली जात आहे. मात्र सध्याच्या घटकेला जाधव खेडेकर आणि तुपकर या तिघांमध्ये तिरंगी लढत होईल.

आमदारांचे बलाबल लक्षात घेता या मतदारसंघात सध्या महायुतीचेच वर्चस्व दिसते आहे. चिखली, जळगाव जामोद आणि खामगाव येथे भाजपचे आमदार आहेत. तर बुलढाणा आणि मेहकर येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. हे बघता महायुतीची ताकद इथे एकवटली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

या मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिंगणात असले तरी यातील प्रमुख उमेदवारांशिवाय बसपाचे गौतम माघाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर हे दोघेही मैदानात आले आहेत. मात्र हे तसे नवखे आहेत. तरीही बसपा आणि वंचितचा जो काही बांधलेला मतदार आहे तो यांना मतदान करेलच.

मतविभाजनावर भवितव्य

या मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराला अजून फारसा वेग आलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे एकदा येऊन गेलेले आहेत. भाजपचे मतदारसंघ प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे हे देखील कामाला भिडले आहेत. त्यांनी सर्वच आमदारांना कामाला लावले आहे. अशावेळी प्रमुख तीन उमेदवारांमध्ये मगर आणि माघाडे हे कोणाची किती मते खातात त्यावर इथला खासदार कोण ते ठरणार आहे.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

बुलढाणा जिल्हा हा पूर्वीपासून जुन्या जनसंघाचा बालेकिल्ला मानला जायचा. इथे अर्जुनराव वानखेडे, किसनलाल आणि मदनलाल संचेती यांनी जुन्या काळात पक्षाची चांगली बांधणी केली होती. १९९० च्या सुमारास झालेल्या भाजप शिवसेना युतीमध्ये त्यावेळी राखीव असलेला हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. तेव्हापासून शिवसेनेने तिथे आपली ताकद वाढवली. १९९६-१९९९ आणि २००४ या काळात शिवसेनेने मुंबईहून आयात केलेले आनंद अडसूळ हे इथे खासदार होते. नंतर या मतदारसंघाचे राखीवपण संपल्यापासून म्हणजेच २००४ पासून हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडेच ठेवून तिथून शिवसेनेचे माजी आमदार प्रतापराव जाधव हे निवडून येऊ लागले. २००९, २०१४ आणि २०१९ असे तीनदा प्रतापराव येथून विजयी झालेले आहेत. यावेळी ते चौथ्यांदा नशीब आजमावत आहेत.

लोकवर्गणीतून तुपकरांचा प्रचार

प्रतापराव जाधव हे तीनदा आमदार होते. काही काळ युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते, तर खेडेकर हे शिवसेना काँग्रेस शिवसेना असा प्रवास करीत काही काळ जिल्हा परिषद अध्यक्षही राहिले आहेत. परिणामी दोघांचाही जनसंपर्क चांगला आहे. दोघांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. इथून निवडणूक लढण्यास रविकांत तुपकर हे देखील इच्छुक होते. त्यांचा वंचितकडून उमेदवारी घेण्याचा प्रयत्न होता. मात्र ते न जमल्यामुळे त्यांनी शेतकरी संघटनेचे सगळे साथीदार एकत्र केले आहेत आणि लोक वर्गणीतून आपला प्रचार सुरू केला आहे. हे बघता तुपकर हे या दोघांनाही लढत देऊ शकतात हे नक्की.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर