महाराष्ट्र

"हिच तर 'मोदी की गॅरंटी', विरोधकही लाभार्थी"; 'तो' फोटो शेअर करत भाजपचा उद्धव ठाकरेंना टोमणा

Rakesh Mali

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. दौरा संपल्यानंतर ठाकरे यांनी परतीचा प्रवास हा रेल्वे मार्गाने केला. त्यांनी खेड ते मुंबईपर्यंतचा प्रवास पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत वंदे भारत या ट्रेनने केला. या प्रवासादरम्यानची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरुन भारतीय जनता पक्षाने हिच तर मोदीकी गॅरंटी, विरोधक देखील लाभार्थी, असे म्हणत ठाकरे यांना टोमणा मारला आहे.

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत 'एक्स'हँडलवरुन उद्धव ठाकरे यांच्या प्रवासाची छायाचित्रे शेअर केली आहेत. भाजपने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत ट्रेनमधील प्रवासादरम्यानचे दोन फोटो ट्विट केले आहेत. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये विनायक राऊत दिसत आहेत.

"मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास तिसरी बार..... मोदी सरकार !", असे म्हणत ठाकरे यांना टोमणा लगावला आहे. तसेच, "हीच तर #ModiKiGuarantee कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की", असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, "#ModiHaiToMumkinHai #विरोधक_देखील_लाभार्थी", असे हॅशटॅग देखील भाजपने वापरले आहेत.

भाजपने मारलेल्या या टोमण्याला ठाकरे गटाकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. "कोस्टल रोड, MTHL ही ठाकरेंची गॅरेंटी होती, पण क्रेडीट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटनाची घाई होतेय. MTHL अनेक महिने तयार असूनही उद्धाटनाला विलंब केला आणि आता कोस्टल रोड तयार नसूनही उद्धाटनाची घाई चाललीये. पण तुम्ही कितीही घाई केलीत तरी मुंबईचे हाल करणाऱ्या खोके सरकारला जनतेच्या मनात क्रेडीट मिळणार नाहीच!", असे प्रत्युत्तर ठाकरे गटाकडून देण्यात आले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस