ANI
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेंतर्गत तीन सिलिंडर मोफत; शासन निर्णय जारी

Swapnil S

मुंबई : ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत महिना १,५०० रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असून ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेंतर्गत वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. याबाबत शासन निर्णय जारी झाला असून, याची अंमलबजावणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जाणार असून राज्यातील गोरगरीब कुटुंबांना याचा फायदा होणार आहे.

स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून ‘पंतप्रधान उज्ज्वला’ योजना सन-२०१६ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे.

महाराष्ट्रात सद्य:स्थितीत ‘पंतप्रधान उज्ज्वला’ योजनेंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच या योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच, एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरे सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकासाठी अन्य साधन उपलब्ध नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली होती.

ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील ‘पंतप्रधान उज्ज्वला’ योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

राज्यातील ५२.१६ लाख लाभार्थ्यांना मिळेल फायदा

या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान उज्ज्वला’ योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ या नावाने राबविण्यात येणार आहे.

एका कुटुंबात एकच लाभधारक

एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार असून, या योजनेचा लाभ केवळ १४.२ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत