Chandrapur : चार महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद; गुंजेवाही जंगलात थरारक मोहीम (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

Chandrapur : चार महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद; गुंजेवाही जंगलात थरारक मोहीम

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात चार महिलांचा बळी घेणाऱ्या टी-२ वाघिणीला अखेर वनविभागाने शनिवारी रात्री जेरबंद करण्यात यश मिळवले.

Swapnil S

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात चार महिलांचा बळी घेणाऱ्या टी-२ वाघिणीला अखेर वनविभागाने शनिवारी रात्री जेरबंद करण्यात यश मिळवले. गुंजेवाही जंगल परिसरात पार पडलेल्या या थरारक कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक वाघिणीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गावकऱ्यांनी वनविभागाच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी परिसरात अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे. वनविभागाने नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे

गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या १३ महिलांच्या गटावर शुक्रवार २२ मे रोजी टी-२ वाघिणीने अचानक हल्ला चढवला होता. दबा धरून बसलेल्या वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची ही महाराष्ट्रातील दुर्मिळ आणि धक्कादायक घटना मानली जात आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तातडीने कारवाई करून वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत होती.

या हल्ल्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करून गुंजेवाही-पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात मोठी शोधमोहीम सुरू केली. संबंधित वाघिणीला पकडण्यासाठी आवश्यक परवानग्या घेत ट्रॅप आणि ट्रॅन्क्युलायझरची व्यवस्था करण्यात आली होती. वनअधिकाऱ्यांनी जंगलातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत ऑपरेशन युद्धपातळीवर राबवले.

वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान वाघिणीसोबत तिचे बछडे आढळून आले नाहीत. त्यामुळे वाघिणीच्या हालचालींसह तिच्या बछड्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास आणि शोधमोहीम राबवली जाणार आहे.

अंधारात घेतला अचूक वेध

वनविभागाच्या पथकाने ट्रॅन्क्विलायझर डार्टच्या साहाय्याने शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास एका वाघावर अचूक वेध घेतला. मात्र अंधारामुळे सुरुवातीला पकडण्यात आलेला प्राणी हल्लेखोर टी-२ वाघीणच आहे की दुसरा वाघ, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर वनविभागाने पडताळणी केली असता हीच चार महिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेली टी-२ वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. रात्री आठच्या सुमारास तिला पूर्णपणे जेरबंद करण्यात आले.

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

Pune : "मुलीला घेऊन जा, नाहीतर..." जावयाचा रात्री फोन अन् काही तासांत IT इंजिनिअर वैष्णवीचा मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा आरोप

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ५ लाखांची मागणी, डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण; अखेर अटक

SEBI कडे ९ कंपन्यांचे आयपीओसाठी अर्ज