महाराष्ट्र

माझ्या पिढीचं 'गोंदण' मी, लेकराला शिकविन गा...अभ्यासक्रमात पारंपरिक गोंदणकलेला मान

'गोंदण' कला ही आदिवासी समाजाची अत्यंत प्राचीन, समृद्ध आणि भावनिक परंपरा आहे. या कलेसह जुळलेली सांस्कृतिक ओळख, सौंदर्यशास्त्र आणि धार्मिक विचार हे सारेच आधुनिक काळात 'Tattoo' सारख्या नव्या रूपात उदयाला येत आहे. मात्र, यामुळे मूळ गोंदण कलाकार असलेला आदिवासी समाज मात्र उपेक्षित राहत आहे. यासाठी या कलेच्या अभ्यासाला आणि प्रसाराला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

नेहा जाधव - तांबे

'गोंदण' कला ही आदिवासी समाजाची अत्यंत प्राचीन, समृद्ध आणि भावनिक परंपरा आहे. या कलेसह जुळलेली सांस्कृतिक ओळख, सौंदर्यशास्त्र आणि धार्मिक विचार हे सारेच आधुनिक काळात 'Tattoo' सारख्या नव्या रूपात उदयाला येत आहे. मात्र, यामुळे मूळ गोंदण कलाकार असलेला आदिवासी समाज मात्र उपेक्षित राहत आहे. यासाठी या कलेच्या अभ्यासाला आणि प्रसाराला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्र सरकारने पारंपरिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला असून, या कलेवर सर्वंकष संशोधन करण्यासाठी एक विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. मंत्रालयात पारंपरिक गोंदण कलाकारांच्या शिष्टमंडळासह झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

आदिम वारशाची नव्या काळात जपणूक -

गोंदणकला आदिवासी समाजात सौंदर्य, धार्मिक श्रद्धा, संरक्षण, स्मृती आणि ओळख यांचे प्रतीक आहे. या कलेत झाडांच्या रंगांपासून मासोळीच्या काट्यांपर्यंत शरीरावरील प्रत्येक आकृतीमागे एक कथा दडलेली असते. तिचा इतिहास नवपाषाण युगातील ‘ओत्झी द आईस मॅन’ पासून इजिप्तच्या ममींपर्यंत, ग्रीक सरदारांपासून जपानी योद्ध्यांपर्यंत आढळतो. भारतात ती गावंढळ समजली गेली, परंतु आज ती फॅशन व्यवसाय आणि प्रसिद्धीचा भाग झाली आहे. आज हीच कला आधुनिक Tattoo स्वरूपात जगभर पोहोचली आहे.

अनेक युवक टॅटू आर्टिस्ट बनत आहेत. सनी भानुशाली यांच्यासारखे भारतीय टॅटू कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होत आहेत. ‘Indian tattoos’ गुगलवर शोधलं तर अनेक आदिवासी डिझाईन्स आजही लोकप्रिय असल्याचे स्पष्ट दिसून येते.

पारंपरिक कलाकारांसाठी पाऊल -

आज पारंपरिक गोंदणकलाकार आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपेक्षित होत चालले आहेत. या कलाकारांची पुढची पिढी दुसरे पर्याय शोधतेय. गोंदणकलेला आजच्या तंत्रयुगात बाजारपेठ आहे, पण पारंपरिक कलाकार मात्र उपेक्षित आहेत. या कलेला शैक्षणिक आणि व्यावसायिक अधिष्ठान मिळाल्यास पारंपरिक कलाकारांना नवसंजीवनी मिळू शकते. आशीष शेलार यांनी सांगितले, की ''गोंदण कलेचा सखोल अभ्यास केला गेला आणि उच्च शिक्षणात त्याचा अंतर्भाव केला गेला तर महाराष्ट्रातील १५० कला इन्स्टीट्यूटमध्ये ही कला शिकवता येईल.''

गोंदण म्हणजे कला, पण ती शास्त्रही आहे -

गोंदणकलेला वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनानेही महत्त्व आहे. काही आदिवासी समाजात गोंदण हाच ॲक्युपंक्चरसारखा उपचार समजला जातो. डोकेदुखी, गुडघेदुखी यावर विशिष्ट ठिकाणी गोंदण केले जाते. यासाठी गोंदण कलेचा सखोल अभ्यास व्हावा, तिचे शास्त्रशुद्ध दस्तावेजीकरण व्हावे आणि ती शिक्षणात समाविष्ट व्हावी असे सरकारचे म्हणणे आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली