रामभाऊ जगताप/कराड
अन्याय होत असताना आपण अनेकदा विरोध करण्याऐवजी दुसऱ्याने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा करतो. ही मानसिकता बदलण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा. दांभिकता सोडून नैतिकतेचा मार्ग स्वीकारा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. कराड येथील शारदीय व्याख्यानमालेत ‘तरुणाईशी संवाद’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, प्रा. बी. एस. खोत यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका आणि नगरपालिका व नगरवाचनालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीपद भूषवले. देशाचे संरक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सहकार, औद्योगिक विकास, शिक्षण, पंचायतराज, कृषी आणि सिंचन क्षेत्रांत त्यांनी विकासाची दिशा दिली. त्यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांनी अन्यायाविरुद्ध उभे राहून सामाजिक परिवर्तनासाठी काम केले पाहिजे, असे मुंढे यांनी सांगितले.
तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात साधने बदलत असली, तरी योग्य-अयोग्य ठरवण्याची जबाबदारी माणसाचीच आहे. माहितीची उपलब्धता वाढली असली, तरी विचारपूर्वक निर्णय घेणे, चारित्र्य जपणे आणि नैतिक मूल्यांनुसार वागणे महत्त्वाचे आहे. सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. अन्नातील भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाबरोबरच ग्राहकांनीही जागरूक राहिले पाहिजे. नियमांचे पालन करणे, प्रश्न विचारणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपल्याला कोणी पाहत नसतानाही नियमांनुसार वागणे, हीच प्रामाणिकपणाची खरी कसोटी आहे. ‘शिवाजी जन्माला यावा, पण दुसऱ्याच्या घरात’ ही मानसिकता सोडून प्रत्येकाने स्वतः पुढाकार घ्यावा. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले. श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुंढे यांनी जिवंत असेपर्यंत समाजसेवक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी चारित्र्य, नैतिकता आणि विश्वासार्हता जपण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजची निवड उद्याचे भविष्य ठरवेल
स्वतः लिहिलेल्या पत्राचे वाचन करताना तुकाराम मुंढे यांनी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. साधने बदलली, तरी योग्य-अयोग्य ठरवण्याची जबाबदारी माणसाचीच राहते. तंत्रज्ञानापेक्षा विश्वासार्ह माणूस अधिक मौल्यवान आहे. प्रत्येकाने आपली मूल्ये जपत सर्वत्र एकसारखे वागावे. आज केलेल्या निवडीवरच उद्याचा समाज घडेल, असा संदेश त्यांनी दिला.
स्पर्धा परीक्षा समाजसेवेचे साधन
स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळवण्याची संधी नसून समाजाप्रति जबाबदारी पार पाडण्याचे साधन आहे. सार्वजनिक सेवेत येणाऱ्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली पाहिजे. पैसे कमावणे हेच उद्दिष्ट असेल, तर शेती, उद्योग आणि व्यवसायाचे पर्याय उपलब्ध आहेत. प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचा मार्ग निवडायचा की अनैतिकतेचा, हे प्रत्येकाने ठरवावे, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
मुंढेंसोबत सेल्फीसाठी तरुणांची गर्दी
व्याख्यानानंतर तुकाराम मुंढे यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी युवकांनी गर्दी केली. मुंढे यांनीही युवकांचे मोबाईल हातात घेऊन सेल्फी आणि व्हिडीओ काढले. त्यांच्या आगमनावेळी उत्साहात स्वागत करण्यात आले.