एक्स @CMOMaharashtra
महाराष्ट्र

तुळजापूरचा कायापालट होणार; ७३ एकर जमीन संपादन करणार - मुख्यमंत्री फडणवीस

तुळजापूरचा विकास करण्यासाठी ७३ एकर जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला गती द्या. पुढील दोन वर्षांत तुळजापूरचा चेहरामोहरा बदलणार असून महत्वाच्या कामांना तातडीने निधी वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : तुळजापूरचा विकास करण्यासाठी ७३ एकर जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला गती द्या. पुढील दोन वर्षांत तुळजापूरचा चेहरामोहरा बदलणार असून महत्वाच्या कामांना तातडीने निधी वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, १८६६ कोटींच्या विकास आराखड्याला तत्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी सादरीकरणावेळी दिली.

तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग घेत शाश्वत विकास करण्यासाठी तुळजापूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे . भाविकांचा त्रास कमी करून त्यांना श्री.तुळजाभवानी देवीजींचे सुलभ व जलद दर्शन मिळावे, सध्याच्या पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचे काम या आराखड्याच्या अंमलबजावणीतून होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

मंदिराचा इतिहास, संस्कृती, वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे. गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीम, ऑनलाईन दर्शन व्यवस्था, भाविकांच्या संख्येचे नियमन,रस्त्यांचे रुंदीकरण, वैकल्पिक मार्ग तयार करणे, नवीन पार्किंग व्यवस्था,वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची वाहतूक सेवा,शौचालयांची संख्या वाढवणे, कचरा वर्गीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन,प्राथमिक आरोग्य सुविधांचा विस्तार,विश्रांती स्थळे,भाविक सुविधा केंद्राची उभारणी,वॉटर कुलर व आरामदायक शौचालयाची सुविधा,सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल पद्धती (ॲप) चा वापर अशा काही सुधारणा या आराखड्यात समाविष्ट आहेत. मंदिर परिसरात मंदिर परिसीमा वाढवणे,मंदिर शिखर संवर्धन, कुंड, तीर्थ सुधारणा व संवर्धन, इतर मंदिर संवर्धन,विद्युतीकरण, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, सुरक्षा व टेहाळणी व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा इत्यादीचा समावेश आराखड्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार अभिमन्यू पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी,विभागीय आयुक्त दिलीप गावडे,छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार उपस्थित होते. मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी आराखड्यातील कामे दोन वर्षात पूर्ण करण्यात यावेत,अशी मागणी केली.

बोटिंग, लाइट अँड साऊंड

आराखड्यात तुळजापूर हेरिटेज टूर विकसित करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले अष्ट तीर्थ भेट व दर्शन,मुख्य मंदिर भेट व दर्शन, रामदरा तलावाच्या डोंगरावर श्री. तुळजाभवानी देवीजी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद रूपात भवानी तलवार देताना १०८ फूट उंचीचे भव्य शिल्प व शिव उद्यान, उद्यानात लाइट अँड साऊंड शो,रामदरा तलावात बोटिंगची सुविधा आदी बाबींचा समावेश आहे.

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी