केंद्रासह महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रात मोदी सरकारसोबत जातील,असा खळबळजनक दावा माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. सोबतच केंद्रात नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू भाजपची साथ कधीही सोडू शकतात, असाही त्यांचा दावा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मोदी-शरद पवार-उद्धव ठाकरे अशा नवीन समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
काय आहे बच्चू कडूंचा दावा?
बच्चू कडू म्हणाले की, केंद्रात भाजपसोबत नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक-दोन विधेयक पास करून घेण्यासाठी थांबले आहेत. त्यानंतर ते कधीही भाजपची साथ सोडू शकतात. नितीशकुमार आणि नायडू गेल्यानंतर पुढे काय? यासाठी भाजप सध्या सोय बघत आहेत. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे केंद्रात मोदी सरकारसोबत जातील असा दावा त्यांनी केला आहे.
''आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार आहे, कोणीह पक्ष सोडू नये,'' शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्या विधानाचा हाच अर्थ निघत आहे. तसेच केंद्रात शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) यांच्या खासदारांची संख्या पाहता जी काही परिस्थिती दिसत आहे, लवकरच ठाकरे आणि शरद पवार केंद्रात मोदींसोबत जातील असेच दिसते, असा दावा कडू यांनी केला आहे.
अजित पवार- एकनाथ शिंदेंची गरज संपली
भाजपला आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची गरज उरली नाही, असा दावा करत ते म्हणाले. गरज सरो अन वैद्य मरो या प्रमाणे किंवा आपल्याला सोडून जाणाऱ्यांचे गळे कापने अशी मोघलांची निती भाजप खेळत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटले आहे.