मुंबई : सात वर्षापूर्वी म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांवरून मंगळवारी विधानपरिषदेत आजी - माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुगलबंदी रंगली. ज्यांना माझा हात पकडून बसायचे होते, ते ‘बात’ पकडून बसले’ अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली, तर ‘अशी काय ‘बात’ होती की ज्यामुळे दुसऱ्याचा हात पकडावा लागला?’ असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंचा उल्लेख ‘कोट्या’धीश असा केला असतानाच ज्ञानेश्वरांच्या ‘काट्याच्या अणीवर वसली तीन गावे’ या भारूडाचा उल्लेख करत त्या गावांची पाटीलकी फडणवीसांकडे असल्याची कोटी उद्धव ठाकरे यांनी केली.उद्धव ठाकरे यांच्यासह उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनेकर या ९ सदस्यांची विधान परिषदेतील मुदत येत्या १३ मे २०२६ रोजी संपत आहे. विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या या सदस्यांना मंगळवारी सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी फडणवीस आणि ठाकरे यांनी एकमेकांना उद्देशून कोट्या केल्या. ‘पुलं’नंतर उद्धव ठाकरे ‘कोट्य’धीश
उद्धव ठाकरे यांचा उल्लेख सहप्रवासी असा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१० सालानंतर सहवास अधिक दृढ झाल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव राजकारणी नाही. बाळासाहेबांप्रमाणेच ते परिणामांची चिंता करत नाहीत. ते उत्तम छायाचित्रकार आहेत. त्यांच्या छायाचित्रांतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते. २०१४ पासून त्यांच्यासोबतची मैत्रीची भावना अधिक तयार झाली.मात्र आता आपल्या राजकीय भूमिका वेगळा असल्याचेही फडणवीस म्हणाले.उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांप्रमाणेच सर्वसामान्यांना राजकारणात मोठे केले हे सांगताना पु.ल. देशपांडे यांना ‘कोट्या’धीश म्हणतात, मात्र पुलंनंतर मी उद्धव ठाकरे यांना कोट्याधीश म्हणेन असा टोला लगावतानाच पुढे या सभागृहात पुन्हा आले तर अधिक कोट्या ऐकायला मिळाव्यात अशी मिश्किल टिपणी फडणवीस यांनी केली. ठाकरे यांचा स्वभाव शांत आणि संयमी असला तरी राजकारणात त्यांचा वेगळा आवेश असतो असे सांगताना फडणवीस यांनी भाषणाच्या शेवटी ‘साजिश की सौगात पकडकर बैठ गये, अनचाहे हालात पकडकर बैठ गये, जिनको मेरा हाथ पकडकर बैठना था, वो बात पकडकर बैठ गये..अशा आशयाचा शेर ऐकवला. त्याला सभागृहातील सदस्यांनी दाद दिली.
नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आपला स्वभाव हा मूळ कलाकाराचा असल्याचे मान्य करताना अनपेक्षितरीत्या आपण मुख्यमंत्री म्हणून विधान परिषदेचे सदस्य झाल्याचे सांगितले. निरोपाच्या दिवशी उपस्थित राहिल्यावर आपल्याविषयी नेमके इतरांच्या मनात काय आहे हे कळते, असा टोला लगावतानाच ‘ऐसी कोन सी बात थी, और किसीका हात पकडना पडा, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. यावेळी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात खंबीरपणे साथ देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच अन्य सहकारी मंत्री, प्रशासन, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री असताना कोरोनाकाळात केलेले काम तसेच अटलसेतू, कोस्टल रोड यासारखे विकासप्रकल्प अर्थचक्र थांबले असतानाही सुरू ठेवल्याची आठवण करून ठाकरे यांनी करून दिली.ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलून घेतले. मात्र आता स्वार्थापोटी रेडे कापले जात आहेत, असा टोला ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला. यावेळी विंदा करंदीकर, सुरेश भट यांच्या काव्यपंक्तींच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विंदांच्या ‘केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयार पाहिजे’ यातील काव्याप्रमाणे अनुभव घेत असल्याचे सांगितले. जे डोक्यावर घेऊन नाचतात, तेच स्वार्थापोटी पायदळी तुडावायला बघत नाहीत, अशी खंत ठाकरे यांनी बोलून दाखवली . त्याचवेळी सुरेश भटांच्या ‘मित्र कोण आणि शत्रू कोण, गणित साधे कळत नाही. नाही भेटला असा कोणी ज्याने छळले नाही. रुसून राहिले अगदी माझ्या जवळचे, पण मी कुणालाच कळलो नाही,’ या ओळी ऐकवत पक्षातील फुटीरांना तसेच विरोधकांना टोला लगावला.
उद्धव ठाकरेंनी निरोपाच्या भाषणाचा सुरेश भटांच्या कवितेनं शेवट केला..
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
मी कुणाला कळलोच नाही…!
मी कुणाला कळलोच नाही…!
एकनाथ शिंदे म्हणाले ‘साहेब’; ‘भेटीसाठी मन आतुरले आहे’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचा ‘साहेब’ असा उल्लेख करत कटुता कमी झाल्याचे संकेत दिले. तसेच शिंदे यांनी ठाकरे यांना निरोगी, दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासह इतर सदस्यांना निरोप देताना, ‘सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. भेटीसाठी पुन्हा आतुरले मन आहे’ अशा काव्यपंक्ती ऐकवल्या. काही लोक पुन्हा सभागृहात भेटतील, तर काही निवडणुकीत समोरासमोर भेटतील, असा टोलाही लगावला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ठाकरे कुटुंबाशी असलेले स्नेहसंबंध अधोरेखित करताना उद्धव ठाकरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या