मुंबई : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही लालबागच्या राजाची परंपरा खंडित केलीत, सार्वजनिक गणेशोत्सव रोखलात, गणेशभक्त आणि बाप्पाची ताटातूट केलीत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गणेशभक्त आणि लालबागच्या राजाच्या पायावर नाक घासून माफी मागावी, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, खा. संजय राऊत यांनी स्वतःच्या अज्ञानाचा सार्वजनिक कार्यक्रम करणे आता बंद केला पाहिजे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका करताना जीभ खूपच वळवली, हे महाराष्ट्र बघतोय. खऱ्या अर्थाने अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री नव्हते किंबहुना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही नव्हते तेव्हापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला सातत्याने येत राहिले आहेत. आज संजय राऊत म्हणतात की, लालबागचा राजा कोण कुठे पळवेल किंवा कोण कुठे गुजरातला घेऊन जाईल याच्यावर तुम्ही केलेले विधान हे हास्यास्पद आहे. श्रीमान संजय राऊत कदाचित विसरला असाल, तुमच्याच पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सव्वाशे वर्षाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पहिल्यांदा खंडित झाली होती आणि लालबागचा राजा सुद्धा बसला नव्हता.
शेलार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना लालबागचा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या आमच्या भाविकांची आणि बाप्पाची ताटातूट झाली होती. गणेशोत्सव मंडळाला टाळे लावण्याचा कुहेतू हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्या शिवसेनेचा होता, हे कदाचित आज तुम्ही विसरला असाल, म्हणून तुम्हाला आठवण करून देतो. त्यावरचा राग महाराष्ट्रातल्या जनतेचा अजून ही गेलेला नाही. जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची लढाई न्यायालयात लढायची वेळ आली तेव्हा तुम्ही पाठ दाखवली होतीत. आम्ही ही लढाई न्यायालयात ही लढलो होतो.
शेलार म्हणाले की, तुम्ही म्हणालात की, शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललेय हे समजायला देवेंद्र फडणवीस यांना १०० वर्षे लागतील. राऊत यांना आम्ही सांगतो की, कोणाच्या डोक्यात काय चाललेय हे आणि कोणाच्या घरात काय चाललेय? याच्यात घुसण्याची सवय ही तुमची आहे. एक कार्यकर्ता, स्वयंसेवक, नेता म्हणून देवेंद्रजींनी केलेले काम अख्ख्या महाराष्ट्राला पुढची कित्येक वर्ष पुढे नेणाऱ्या गतीचे काम आहे. तर कोणाच्या डोक्यात काय चाललेय बघण्याची वृत्ती ही आमची नाही आणि भाजपची नाही. कुणाच्या घरात झाकणे हे तुमची, अशा शब्दांत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.