महाराष्ट्र

कर्जमुक्ती मिळेपर्यंत ‘मतबंदी’चा मार्ग अवलंबा; पार्डीतील शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही ठोस आर्थिक मदत मिळालेली नाही. पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे महात्मा फुले कर्जमुक्ती योजना तात्काळ सुरू करा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत ‘मतबंदी’ करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Swapnil S

नांदेड : अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही ठोस आर्थिक मदत मिळालेली नाही. पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे महात्मा फुले कर्जमुक्ती योजना तात्काळ सुरू करा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत ‘मतबंदी’ करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते लोहा तालुक्यातील पार्डी येथे गुरुवारी आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा शेतकरी संवाद दौरा सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची दोन लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी केली होती. पण आजचे सरकार फक्त आश्वासने देते, प्रत्यक्षात कर्जमाफी करत नाही. काही महिन्यांपूर्वीची अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने मदत देण्याचे आश्वासन दिले, परंतु आजतागायत एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. रोजगार हमी योजनेच्या नावाखाली मदतीचे आश्वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याला निधी मिळाला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

माझ्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कृषी मंत्री शरद पवार यांच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली. मग आजचे सरकार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती का करू शकत नाही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत ‘मतबंदी’ करा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 'माझ्या काळात संजय राठोड यांच्यावर आरोप होताच त्यांना मी तत्काळ मंत्रिपदावरून बाजूला केले होते; पण आज मात्र भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे,' असे ते म्हणाले. पार्डी येथे सायंकाळी झालेल्या कार्यक्रमास विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार अनुसया खेडकर, ॲड. पुरुषोत्तम धोंडगे, वत्सला पुयड, भुजंग पाटील, महेश खेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा आक्रोश

शेतकऱ्यांनी अद्याप एकाही प्रकारची आर्थिक मदत न मिळाल्याची वेदना ठाकरे यांच्यासमोर मांडली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग यांसह अनेक पिकांचे नुकसान तर झालेच, पण जमिनीच खरडून गेल्याने बागायती शेतीही उद्ध्वस्त झाली.

पैसे जातात कुठे?

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी निधी सोडत असल्याचे सांगते, पण तो प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. 'मग हे पैसे जातात कुठे?' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शक्तीपीठ प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध होतात; त्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेतल्या जातात, पण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडे पैसा नसतो, अशी टीका त्यांनी केली.

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी

मिठी नदी गाळ घोटाळा : EOW कडून दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल

Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार