फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी रिक्षाचालक शकील शेख उर्फ शेख छोटू याचा जामीन अर्ज विशेष NIA न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, शेख हा हत्येच्या गुन्हेगारी कटाचा भाग होता आणि त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य ठरणार नाही.
उमेश कोल्हे हे अमरावतीतील एक मेडिकल स्टोअर चालवत होते. २१ जून २०२२ रोजी रात्री ते आपल्या स्कूटरवरून घरी जात असताना तिघांनी त्यांची गाडी अडवून मारहाण करत त्यांची निर्घृण हत्या केली. निलंबित भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे त्यांची हत्या करण्यात आली, असे तपासात समोर आले.
गुन्ह्यातील प्रत्येक दुवा महत्त्वाचा - न्यायालय
विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आपल्या आदेशात नमूद केले की, “उमेश कोल्हे यांची हत्या करून समाजात दहशत पसरवण्याचा या टोळीचा उद्देश होता आणि त्यात त्यांनी यश मिळवले. म्हणूनच या गुन्ह्यातील प्रत्येक दुवा तितकाच महत्त्वाचा आणि जबाबदार आहे.”
न्यायाधीश बाविस्कर पुढे म्हणाले, “जर मुख्य गुन्हेगार हा झुंबराची शेवटची साखळी असेल आणि प्रेरक व्यक्ती हा त्या झुंबराचा हुक असेल, तर मध्ये असलेल्या प्रत्येक साखळीला ते वजन पेलण्यासाठी तितकंच मजबूत असावं लागतं. त्याचप्रमाणे, आरोपीने जरी लहान भूमिका बजावली असली तरी तो या कटाचा अविभाज्य भाग होता.”
शेख फक्त बैठकीला उपस्थित
बचाव पक्षाने युक्तिवाद करत म्हटले, शेखवर खोटे आरोप लादले गेले आहेत. तो फक्त बैठकीला उपस्थित होता. पण, गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी नव्हता. शेख हा रिक्षाचालक असल्यामुळे परिसरातील अनेक लोकांशी त्याचा परिचय होता. ज्यामुळे चुकून तो या कटाचा भाग समजला गेला.
शेख गुन्ह्यात स्वेच्छेने सहभागी
यावर सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, पहिल्या हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर २० जून २०२२ रोजी झालेल्या पुढील बैठकीत शेख उपस्थित होता. हत्येनंतर त्याने इतर आरोपींना पळून जाण्यास आणि लपवण्यास मदत केली. त्याला संपूर्ण कटाची माहिती होती आणि त्याने स्वेच्छेने यात सहभाग घेतला.
न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करून निर्णय दिला, की आरोपीविरुद्ध प्राथमिक ठोस पुरावे आहेत. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य ठरणार नाही.