महाराष्ट्र

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या अखेर मान्य; अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पगार जमा होणार - गिरीश महाजन

गेल्या पाच दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या अखेर मान्य झाल्या असून अधिवेशन संपल्यानंतर शिक्षकांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या अखेर मान्य झाल्या असून अधिवेशन संपल्यानंतर शिक्षकांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांनी मंगळवारी रात्री शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यासोबत बैठकीसाठी बोलावले होते. त्यानुसार बुधवारी विधिमंडळातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. यानंतर महाजन यांनी आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनाला भेट दिली. “अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तुमच्या खात्यात पगार पडेल आणि यापुढे तुमच्या पगाराची तारीख पुढे सरकणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारची भूमिका सकारात्मक

गिरीश महाजन म्हणाले की, “आमची भूमिका सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला तुमची काळजी आहे. आपण सामान्य कुटुंबातील असून तुमचे पोट या पैशांवरच आहे, याची आम्हाला कल्पना आहे. फडणवीस यांनी २० टक्के, ४० टक्के आणि त्यानंतर ६० टक्के पैसे दिले. मात्र, सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळे आमच्याकडून पुढचे टप्पे देण्यास उशीर झालेला आहे. तुम्ही याबाबत वारंवार मागणी करत होता. पण आता तुमचा पगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचाच आहे. तसेच यापुढे पगाराची तारीख पुढे सरकणार नाही.

राज्यात ५८४४ अंशतः अनुदानित खासगी शाळा

राज्यामध्ये सध्या ५८४४ अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये ८२० प्राथमिक, १९८४ माध्यमिक तसेच ३०४० उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ३५१३ प्राथमिक, २३८० माध्यमिक आणि ३०४३ उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. या शाळांमध्ये एकूण ८६०२ प्राथमिक शिक्षक, २४०२८ माध्यमिक शिक्षक आणि १६९३२ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत