महाराष्ट्र

‘वंचित’ची ‘आरक्षण बचाव यात्रा’; अजित पवारांना पुन्हा राजकारणातील ‘दादा’ करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर ­: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, त्यांचे राजकारण पुनर्स्थापित करून आम्ही त्यांना पुन्हा राजकारणातील 'दादा' करू, असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, सगेसोयरे ही भेसळ आहे, घाईघाईत देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावीत, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन भरकटले आहे, असे आपण म्हणणार नाही. मात्र, त्यांना आता ठाम भूमिका घ्यावी लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.

शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा २६ जुलै रोजी केली होती. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याला वंदन करून कोल्हापूर येथून आपण ‘आरक्षण बचाव यात्रे’ची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आमचा वापर करीत आहे. आम्ही वंचितकडे चाललो असे सांगून ते जागा वाढवून देण्याची मागणी महायुतीकडे करीत असावेत. त्यामुळे अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, आम्ही पुन्हा त्यांना राजकारणातील 'दादा' करू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन भरकटलंय असे म्हणणार नाही. जरांगे-पाटील यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. श्रीमंत मराठा बरोबर आहेत की जे निवडून आले त्यांच्याबरोबर आहेत, हे स्पष्ट करावे लागणार आहे. सगेसोयरे ही भेसळ आहे. कुणबी समाजाला १९९३ मध्ये आरक्षण दिले गेले, ते शाबूत आहे. मात्र, इतर मार्गाने सध्या काही जण ते मिळवू पाहात आहेत. घाईघाईत आता काढलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून आम्ही ‘आरक्षण बचाव यात्रे’ला सुरुवात करणार आहोत. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना येथे काढण्यात येईल. त्यानंतर यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगरला ७ किंवा८ ऑगस्ट रोजी होईल, असेही ते म्हणाले. यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी सभा घेतल्या जाणार आहेत. आमच्या यात्रेत छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, वाघमारे कोणीही येऊ शकते, असेही ते म्हणाले.

संभाजी महाराज आणि शाहू महाराजांमध्ये वाद असेल, असे मला वाटत नाही. संभाजी भिडे यांच्यामार्फत मशिदीच्या विरोधात राजकारण केले जात आहे. पूजा खेडकरबाबत तुम्ही पेपरवाले ट्रायल करत आहात. डॉक्टरने सर्टिफिकेट दिले आहे त्याच्यावर कारवाई का करत नाहीत. दिलीप खेडकर निवृत्त झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध कोणतीही चौकशी नाही. तिच्या आईने पोलिसांविरोधात काय केले असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. चूक असेल तर त्यांना दोषी धरा, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींचा लढा हाती घ्या, अशी अनेक ओबीसी संघटनांनी विनंती केली. काहीजण नामांतराची आठवण करून देत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा हा श्रीमंत मराठ्यांनी लावलेला वाद आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते, काँग्रेस, एनसीपी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हते. या बैठकीमध्ये, नेमकी राजकीय पक्षांची भूमिका काय, हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीतून विचारण्यात आला. श्रीमंत मराठ्यांचे पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा निघणार नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

आंदोलने श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजेत

श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना फसवले आहे. त्यामुळे ओबीसींच्या हातामध्ये सत्ता द्या, अशी मागणी यात्रेमध्ये करणार आहोत. गरीब मराठ्यांना टिकाऊ आरक्षणाचे वेगळे ताट मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही, तोपर्यंत कुठलेही सरकार भूमिका घेईल, असे मला वाटत नाही. मराठ्यांना आरक्षण न देणे श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. आंदोलने श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजेत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन