मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाण्यातून स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी अप्रत्यक्ष टीका केली. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कामरा यांची पाठराखण केल्याचा आरोप करत विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी कामरा व अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले.
कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे सादर केल्यानंतर शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर राज्यात शिवसैनिकांकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. विधानभवनातही यावरुन वाद रंगला. शिवसेनेकडून (ठाकरे) कामरा यांच्या व्हीडिओची पाठराखण करण्यात आली. उपनेत्या अंधारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांविरोधात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दाखला देत, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान दिले. स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, तुषार आपटे यांची कार्यालये का तोडली नाही, असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांतून केला.
भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी अंधारे यांच्या या विधानांचा दाखला देत, अंधारे आणि कामरा यांच्याविरोधात बुधवारी विधान परिषदेत हक्कभंग मांडला. कामरा आणि अंधारे यांनी शिंदे यांचा उल्लेख केल्याने दोन्ही सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला, तर शिवसेनेचे सदस्य हेमंत गोडसे यांनी कामरा याचे अर्बन नक्षलवादी उमर खालीदसोबत फोटो प्रसारित झाले आहेत. कामरा दंगली घडविण्याच्या मानसिकतेतून जाणीवपूर्वक प्रकार करत आहे. सध्या तो परराज्यात पळून गेला असून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
कुणाल कामराची टी-सिरीजवर टीका
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कुणाल कामरा हा कॉमेडियन विशेष चर्चेत आला आहे. त्याच्या 'नया भारत' या व्हिडिओवरुन गदारोळ माजला होता आणि या व्हिडिओबाबतीत त्याने एक पोस्ट शेअर करत टी-सीरिजला धारेवर धरले आहे. दरम्यान, कुणाल कामराने बुधवारी ‘हवा हवाई’ हा नवा व्हीडिओ जारी केला असून त्यात त्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.
पोलिसांचे कामराला पुन्हा समन्स
एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या गाण्यावरुन कुणाल कामराला चौकशीसाठी पोलिसांनी समन्स बजावले होते. पण तो हजर राहिला नाही. त्यामुळे आता त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला पहिले समन्स पाठवले होते. पण तो हजर राहिला नाही. त्यामुळे आता त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.