विजय पाठक / जळगाव
निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ जाहीर होण्यानंतर आता जळगाव आणि बीड जिल्ह्यांसाठी पालकमंत्रिपदाची दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे राज्यात अद्याप पालकमंत्री जाहीर झाले नाहीत. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता सोमवारी ते जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक निकालानंतर मंत्रिमंडळ स्थापनेला उशीर झाला. मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. तीन पक्षांच्या सरकारात याबाबत एकमत होत नसल्याने त्यास उशीर झाला. त्यानंतर आता अद्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री जाहीर झालेले नाहीत. विशेषत: बीड आणि जळगावसाठी पालकमंत्री कोण याबाबत वाद असल्याचे कळते.
मागील वेळी शिंदेगटाचे गुलाबराव पाटील हे पालकमंत्री होते. यावेळी देखील गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्रिपदासाठी आग्रह धरला आहे तर भाजपने देखील समान म्हणजे पाच जागा जिंकल्या असून यावेळी पालकमंत्रीपद भाजपला हवे आहे. यंदा जिल्ह्यात गिरीश महाजन आणि संजय सावकारे हे भाजपकडून दावेदार आहेत.
सोमवारपर्यंत पालकमंत्री जाहीर होण्याची अपेक्षा
पालकमंत्री यांच्या हातात डीपीडीसीचा निधी असतो. निधी वाटपाचे काम पालकमंत्री करत असतात, त्याचा लाभ पक्ष विस्ताराला मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात पालकमंत्रिपदासाठी भाजप आणि शिंदे गट दोन्ही दावेदार आहेत. जळगावचा हा पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने राज्यातील सर्व पालकमंत्री हे जाहीर होऊ शकलेले नाहीत. २६ जानेवारी प्रजासत्तक दिनासाठी हे लवकर जाहीर होणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत हे पालकमंत्री जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.