शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सध्या शिवसेनेवर येणार प्रत्येक वार झेलताना आणि त्याला त्याच पद्धतीने पत्यूत्तर देताना दिसत आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटात आपले एक वलय निर्माण केले आहे. मात्र, अंधारे यांची प्रगती ठाकरे गटातील अनेक नेत्याचा बघवत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे बीड जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या मारल्याचा दावा केला आहे. एक व्हिडिओ प्रसारीत करून त्यांनी याबाबतचा दावा केला आहे. सुषमा अंधारे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबतचा उलगडा केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या 'महाप्रबोधन' यात्रेच्या समारोप सभेचे 20 मे रोजी बीडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. महाप्रबोधन यात्रेच्या राज्यभरातील सभा चांगल्याच गाजल्या, बीड येथील ग्रामीण भागात होणाऱ्या सभेला खासदार संजय राऊत आणि मी दोन्ही पहिल्यांदाच एकत्र उपस्थित राहणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना अस्वस्थ वाटण स्वाभाविक आहे, असे सुषणा अंधारे यांनी म्हटले आहे.
नेमका काय होता घटनाक्रम!
या प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना अंधारे म्हणाल्या की, "काल स्टेजची पाहणी करायला गेलो त्यावेळी आप्पासाहेब जाधव हे नाराज दिसत होते. बॅनरवर फोटो नसल्याने ते नाराज होते. ते काही विषयांवर बोलले, त्यांना नी नंतर बोलू असे सांगितले. दुसरे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी हॉटेलवर जाऊन बोलू असे सांगितले." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "मी गाडीत बसून फेसबुक लाईव्ह द्वारे सभेची माहिती देत असताना, आप्पासाहेब जाधव यांनी एका मुलाला काम सांगितले. त्यावर तो मी मजूर नाही असे म्हणाला. त्यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी असशील तू जाहगीरदार मी जिल्हाप्रमुख आहे, माझ्याशी असे बोलतो का? असे म्हणत बाजाबाची केली. यानंतर वाद वाढत गेला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. पुढे मारामारी सुरु झाली आणि गाडी फुटली." असे त्या म्हणाल्या.
"आमचा हे प्रकरण तिथल्या तिथे मि़टवण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही परिस्थितीत सभेला गालबोट लागू नये, असे माझे मत होते. मी इतर सभांना थेट व्यासपीठावर जाते. मात्र ही माझ्या जिल्ह्यातील सभा असल्याने मी चार दिवसांपासून आढावा घेत होती." असे त्यांनी सांगितले. आप्पा साहेब जाधव ठरवून सगळ करत होते, असा आरोप करत त्या म्हणाल्या की, "गणेश वरेकर हा स्थानिक कार्यकर्ता अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचे सांगत होता. आम्ही त्याला समजावले. आप्पासाहेब जाधव हे ठरवून सगळ करत होते. त्यांना गोंधळ घालायचा होता. एवढे घडूनही आम्ही शांतता राखत होतो", असे त्यांनी सांगितले.
खरंच मारहाण झाली का?
आप्पासाहेब जाधव यांनी चापट्या मारल्याचा केलेल्या दाव्यावर अंधारे म्हणाल्या की, "त्यांना गोंधळ घालायचा होता. सुषमा अंधारेंवर हात उचलला असे सांगितले तर गोंधळ उडेल. एक पुरुष स्व:ता येऊन हात उचलला असे सांगतो. यावरुन त्याच्या मनात काय आहे हे कळते", असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे. तुम्हाला मारहाण करण्यात आली का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, "मला मारहाण झाली नाही. मारहाण झाली असती तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का? त्यांना गोंधळ उडवायचा होता. त्याचा दावा खरा असता तर हे प्रकरण थांबले असते का?" असे म्हणत त्यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.