मुंबई/पुणे : बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून शहरात मध्यम ते मुसळधार पावसासह ५० ते ६० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवार, २१ आणि बुधवार, २२ जुलै रोजी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सरींसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांना प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर २३ जुलै रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल आणि ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मराठवाड्यातही २१ आणि २३ जुलै रोजी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी
दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरीतील मंडणगड आणि कोयना क्षेत्रात सर्वाधिक १७ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय भिरा येथे १५ सेंटीमीटर, मुंबईतील तुळशी तलाव परिसरात १४ सेंटीमीटर, तसेच राधानगरीमध्ये १२ सेंटीमीटर पाऊस झाला आहे. माथेरान, पनवेल, लांजा, वाडा, चिपळूण आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी ११ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामानाचा हा वाढता जोर पाहता राज्य प्रशासनाने सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला पूर्णपणे सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेत ५.६ मिमी, तर उपनगरातील सांताक्रूझ वेधशाळेत ८८.४ मिमी पावसाची नोंद झाली. शेजारील ठाण्यात ११५ मिमी, तर नवी मुंबईत सरासरी ९२.१० मिमी पाऊस झाला.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर २२ आणि २३ जुलै रोजी मुंबई व ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सातही तलावांमध्ये ५४.०५ टक्के पाणीसाठा
दरम्यान, पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. सोमवारी उपलब्ध आकडेवारीनुसार, सातही तलावांमध्ये ७.८२ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच ५४.०५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
पालघर ते सिंधुदुर्ग हाय वेव्ह अलर्ट
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २४ आणि २५ जुलै रोजी देखील मुसळधार पाऊस कायम राहील. समुद्रकिनारपट्टीवर पालघर ते सिंधुदुर्ग दरम्यान हाय वेव्ह अलर्ट जारी करण्यात आला असून लाटांची उंची ३.५ मीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २४ जुलैपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून राज्य प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.