महाराष्ट्र

एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी पत्नीने दिली पतीच्या खुनाची सुपारी

पिंपरगव्हाण शिवारात ११ जून रोजी मंचक गोविंद पवार (रा. बीड) यांचा मृतदेह आढळून आला

प्रतिनिधी

एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी पत्नीनेच १० लाख रुपयांत पतीच्या खुनाची सुपारी दिली व खुनानंतर अपघाताचा बनाव केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत तपास करीत या गुन्ह्याची उकल केली व याप्रकरणी पत्नीसह दोन आरोपींना गजाआड केले.

पिंपरगव्हाण शिवारात ११ जून रोजी मंचक गोविंद पवार (रा. बीड) यांचा मृतदेह आढळून आला होता. जवळच दुचाकीही होती. त्यामुळे अपघातात हा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी वाटत होते; मात्र पोलिसांच्या तपासात मंचक पवार यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा आढळल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सतीश वाघ व उपनिरीक्षक संजय तुपे यांनी तपासाची चक्रे फिरवली. नातेवाईकांच्या चौकशीत संशय आल्याने पोलिसांनी खोदून चौकशी केली असता, मंचक यांनी एक कोटीचा जीवन विमा उतरवल्याची माहिती मिळाली. या पैशांसाठी पत्नी गंगाबाई हिनेच १० लाख रुपयांत श्रीकृष्ण सखाराम बागलाने (२७, रा. काकडहिरा) याला व त्याच्या तीन मित्रांना पतीच्या खुनाची सुपारी दिली होती. यापैकी दोन लाख रुपये आगाऊ दिल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी गंगाबाई पवार, श्रीकृष्ण बागलाने, सोमेश्वर गव्हाणे (रा. पारगाव, सिरस) यांना अटक केले, तर दोन जण फरार आहेत.

अपघाताचा केला बनाव

श्रीकृष्ण बागलाने याने मंचक पवार यांना १० जून रोजी रात्री भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याच्या डोक्यात वार करून खून केला. मृतदेह दुचाकीवर नेऊन एका टेम्पोला धडकवून अपघाताचा बनाव करण्यात आला.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर