'विनर्स अकॅडमी'ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई  
महाराष्ट्र

'विनर्स अकॅडमी'ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीदरम्यान बुडून मृत्यू झालेल्या ८ विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कोणत्याही प्रकारच्या अधिकृत परवान्याशिवाय आणि ना हरकत प्रमाणपत्राशिवाय आळंदीत बेकायदेशीरपणे चालवली जाणारी 'विनर्स अकॅडमी' ही खासगी शिकवणी वर्ग संस्था आळंदी नगरपरिषदेने शुक्रवारी सील केली आहे.

Swapnil S

पुणे : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीदरम्यान बुडून मृत्यू झालेल्या ८ विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कोणत्याही प्रकारच्या अधिकृत परवान्याशिवाय आणि ना हरकत प्रमाणपत्राशिवाय आळंदीत बेकायदेशीरपणे चालवली जाणारी 'विनर्स अकॅडमी' ही खासगी शिकवणी वर्ग संस्था आळंदी नगरपरिषदेने शुक्रवारी सील केली आहे.

गुरुवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत, आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे ४८ जणांचे विद्यार्थी आणि शिक्षकांचे पथक (२५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक) दिवेआगर बीचवर सहलीला गेले होते. यादरम्यान, १६ वयोगटातील ८ विद्यार्थी समुद्राच्या पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले आणि पाण्याचा लोट त्यांना ओढून नेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

प्रशासनाची कारवाई

या दुर्घटनेनंतर शुक्रवारी आळंदी नगरपरिषदेने तातडीने पावले उचलत आदेश जारी केला. कार्यालयाच्या दस्तऐवजांची पडताळणी केली असता, विनर्स अकॅडमीने व्यावसायिक कामकाज सुरू करण्यासाठी नगरपरिषदेकडून कोणताही वैध परवाना घेतलेला नाही. प्रथमदर्शनी ही संस्था कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे, असे नगरपरिषदेच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ अंतर्गत कारवाई करत ही इमारत तातडीने सील करण्यात आली असून अधिकाऱ्यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आळंदीत शोककळा : विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सहलीदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्या आठ विद्यार्थ्यांचे पार्थिव आळंदीत पोहोचल्यानंतर, संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. आळंदीत शुक्रवारी सकाळी शेकडो नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी या दुर्दैवी विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप दिला. विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूमुळे आळंदीतील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला आहे, असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. आणखी दोन विद्यार्थ्यांवर आळंदीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, तर दोन विद्यार्थ्यांचे पार्थिव अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि अमरावती येथे नेण्यात येणार असून तेथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा

MPSC चे हरपाळकर यांची उचलबांगडी; सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी

शिक्षणाचे खासगीकरण कंपनीकरणाच्या दिशेने

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ३ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत