कराड : पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण चांगलेच वाढले असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विजांसह वादळी वाऱ्यांचा इशारा दिला गेला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच विदर्भातही पावसाचे संकेत देण्यात आले असून उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे.
पुणे शहरात तापमान ४०.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. बुधवारी कमाल तापमान ४० अंश आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरात आकाश निरभ्र राहील, मात्र दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका जाणवेल. सरासरी तापमान पश्चिम महाराष्ट्रात १९.६ ते ४२.२ अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे. पुढील काही तासांत पावसाला पूरक परिस्थिती तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात गुरुवारी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून विजांच्या गडगडाटात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कमाल तापमान ४१ अंश आणि किमान तापमान २० अंश इतके राहण्याची शक्यता आहे.
सांगलीमध्ये चटका अधिक जाणवत असून कमाल तापमान ४० अंश तर किमान २२ अंश सेल्सिअस नोंदवले जाणार आहे. हवामान विभागाने एक-दोन वेळा गडगडाटी पावसाचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमान ३९ अंश आणि किमान तापमान २१ अंश इतके राहील.
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस; हजार हेक्टर क्षेत्रात नुकसानीचा अंदाज
जळगाव जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट यामुळे रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर चोपडा, जळगाव, यावल या तालुक्यांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सात तालुक्यात सुमारे हजार हेक्टरपर्यंत पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रावेर, मुक्ताईनगर तालुके हे केळीचे असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या तीन तालुक्यातील २५ गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून ७०० हेक्टरमध्ये केळीचे नुकसान झाले असावे, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जळगाव, यावल, चोपडा तालुक्यात ३०० हेक्टरमध्ये ज्वारी,मका आणि केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची माहिती कृषी विभागाकडून घेण्यास व पंचनामा करण्यास सुरवात झालेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.