महाराष्ट्र

आपल्याकडून कमाल जमीन कायद्याचे उल्लंघन; अप्रत्यक्षपणे चुकीची दिली वळवींनी कबुली

Swapnil S

कराड : सातारासह सध्या राज्यात गाजत असलेल्या महाबळेश्वर-मधील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहारप्रकरणी गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीस गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर काही कागदपत्रे सादर केली तर उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी व म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. याप्रकरणी जीवन गलांडे यांनी दि. २९ जुलैला सर्व कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले असून याच दिवशी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. मात्र,अखेर चंद्रकांत वळवी यांनी आपण कमाल जमीन कायद्याचे उल्लंघन केले असून शासन नियमानुसार कार्यवाही करत असल्याचे सांगितल्याने त्यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे आपल्या चुकीची कबुलीच दिली आहे.

'सह्याद्री वाचवा' मोहीमेतंर्गत साताऱ्याचे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उघडकीस आणलेले महाबळेश्वर येथील झाडाणी प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात याविषयी खडाजंगी चर्चा झाल्यानंतर गुरुवारी ११ जुलै रोजी साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी नोटीस बजावलेले संबंधित हजर होते. मात्र यावेळी संबंधितांनी म्हणणे मांडले आणि काही कागदपत्रेही हजर केली,पण उर्वरित कागदपत्र सादर करण्यासाठी आणखी मुदत देण्याची मागणी केली. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी येत्या २९ जुलै ही तारीख देत ही म्हणणे मांडण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी शेवटची संधी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित सामनेवाला पक्ष २९ रोजी देण्यात आलेल्या शेवटच्या संधीचा कसा उपयोग करून घेतायत याकडे महाबळेश्वरसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सातारा येथील अप्पर जिल्हाधिकारी गलांडे यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीसाठी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी उपस्थित राहत झाडाणीप्रकरणी आपले म्हणणे सादर केले.

अप्पर जिल्हाधिकारी यांच्यापुढे सुनावणी पार पडल्यानंतर वळवी यांनी कार्यालयाबाहेर येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत वळवी म्हणाले, या व्यवहारात कमाल जमीन कायद्याचे उल्लंघन झाले आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार सध्या कार्यवाही सुरू आहे,शासन योग्य ते निर्णय घेईल. सुनावणीला हजर रहावे लागत असले तरी सर्वसामान्य लोकांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागते, तसेच आम्हीही या प्रसंगाला सामोरे जावू, असे वळवी यांनी म्हटले आहे.

लवकर निकाल अपेक्षित : सुशांत मोरे

महाबळेश्वर येथील झाडाणीप्रकरणी यापूर्वी चार तारखांना सुनावण्या झाल्या आहेत. गुरुवारी चंद्रकांत वळवी यांनी ते कार्यरत असलेल्या गुजरात राज्यातील अर्थसंकल्प असल्याचे कारण देत उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली आहे. याप्रकरणी अप्प्पर जिल्हाधिकारी यांनी शेवटची संधी देत २९ जुलैला सर्व कागदपत्रांनिशी हजर राहण्यास सांगितले असल्याचे सुशांत मोरे यांनी म्हटले आहे, वळवी यांनी उर्वरित कागदपत्रे मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. या प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले असून प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागणे अपेक्षित असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते मोरे यांनी यावेळी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून शेवटची संधी

झाडाणी येथील ६२० एकर जमीन व्यवहारप्रकरणी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियूष बोगीरवार यांच्यासह आणखी आठ जणांना नोटीस बजावली होती. याप्रकरणी ११ जून, २० जून रोजी सुनावणी झाली तर ३ जुलैची सुनावणी रद्द झाल्याने ११ जुलैला सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार चंद्रकांत वळवी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात हजर झाले. यावेळी नोटीस बजावलेले संबंधितही हजर होते. त्यांनी काही कागदपत्रे सादर केली व उर्वरित कागदपत्रे सादर करण्यास पुढील तारीख मागितली. जीवन गलांडे यांनी शेवटची संधी देत असल्याचे सांगत दि. २९ रोजी सर्व कागदपत्रांनिशी हजर राहण्यास सांगितले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?