मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अमित हिसमसिंग कुमार असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हरियाणातील कैथल येथील रहिवासी अमित या गुन्ह्यात अटक झालेला अकरावा आरोपी आहे.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान अमितने हत्येच्या कटाची पूर्ण माहिती असल्याचे सांगितले. चौथा आरोपी आणि कथित मास्टरमाइंड झीशान अख्तर याने अमितला कोणीतरी त्याच्या (अमित) खात्यात पैसे पाठवेल आणि त्याने ते पैसे काढून झीशान अख्तरला द्यावे, असे सांगितले होते.
पोलिसांनी यापूर्वी १० आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. १२ ऑक्टोंबरला वांद्रे येथे सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. खंडणीविरोधी पथकाकडे हा तपास येताच पथकाने वेगवेगळ्या परिसरातून १० आरोपींना अटक केली होती. त्यात गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग यांचा समावेश आहे. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली होती. त्यात अमीत कुमार याचा समावेश होता.