मुंबई

१५० वर्षांची ‘बेस्ट’ सेवा,बेस्ट बसेसच्या आठवणींना उजाळा! आणिक बस आगारात प्रदर्शन

मुंबईची दुसरी ‘लाईफ लाईन’ म्हणून ओळख असलेली 'बेस्ट' ९ मे १८७४ मध्ये प्रवासी सेवेत रूजू झाली. गुरुवार, ९ मे २०२४ रोजी ‘बेस्ट’ १५० वर्षांची होत आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईची दुसरी ‘लाईफ लाईन’ म्हणून ओळख असलेली 'बेस्ट' ९ मे १८७४ मध्ये प्रवासी सेवेत रूजू झाली. गुरुवार, ९ मे २०२४ रोजी ‘बेस्ट’ १५० वर्षांची होत आहेत. यानिमित्त प्रतीक्षा नगर येथील बस आगारात प्रदर्शनाच्या माध्यमातून १५० वर्षांतील ‘बेस्ट’ बसचा प्रवास, ब्रिटिशकालीन ट्राम आणि आताच्या एसी बसेसच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

बेस्ट परिवहन विभागाच्या १५० वर्षानिमित्त पुढील दोन वर्षांत बेस्टच्या ताफ्यात आणखी पाच हजार इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार होणार आहे.

ब्रिटिशकालीन राजवटीत ९ मे १८७४ रोजी मुंबईत कुलाबा ते पायधुनी व्हाया क्रॉफर्ड मार्केट आणि बोरीबंदर ते पायधुनी व्हाया काळबादेवी अशी बस सेवा सुरू झाली. ब्रिटिश काळात सुरू झालेल्या या बेस्ट बसेस हळुवारपणे प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या. ९ मे १८७४ ते ९ मे २०२४ या १५० वर्षांत बेस्ट उपक्रमाने अनेक चढ-उतार अनुभवले. काळ बदलला तशी बेस्ट बसेसची लोकप्रियता वाढली.

मुंबईची पहिली ‘लाईफ लाईन’ म्हणून मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा ओळखली जाते, तर मुंबईची दुसरी ‘लाईफ लाईन’ म्हणून बेस्ट बसेसने आपली ओळख निर्माण केली. आजच्या घडीला प्रवाशांच्या सेवेत इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस धावत आहेत. भाडेतत्त्वावरील व बेस्टच्या मालकीच्या अशा एकूण ३०३८ बसेस प्रवासी सेवेत धावत असून सद्य:स्थितीत बेस्टच्या दररोजच्या प्रवाशांची संख्या ३२ ते ३५ लाखांपर्यंत गेली आहे. आगामी काळात बसेसची संख्या वाढणार असून पर्यायाने प्रवाशांसाठी सुविधाही वाढणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढणार असल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा आहे सध्याचा ताफा

  • एकूण बस - ३०३८

  • बेस्टच्या गाड्या - १०९७

  • भाडे तत्त्वावरील - १९४१

तीन दिवसीय मोफत प्रदर्शन

बेस्टच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणिक आगारत बेस्टचा इतिहास उलगडणारे प्रदर्शन ९ ते ११ मे या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन मोफत असून मुंबईकरांनी त्यास भेट द्यावी, असे आवाहन ‘बेस्ट’ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक