मुंबई

विसर्जनादरम्यान २१ जणांचा झाला मृत्यू

दोन वर्षे कोरोनाचे विघ्न असल्यामुळे यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला

प्रतिनिधी

राज्यभर तब्बल १० दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी तर काही ठिकाणी शनिवारी सकाळी झाली. दोन वर्षे कोरोनाचे विघ्न असल्यामुळे यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला; मात्र राज्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनादरम्यान २० जणांचा मृत्यू झाला आहे. १४ जणांचा मूर्ती विसर्जनादरम्यान तर चार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असून, विसर्जनाआधी आरतीदरम्यान झाड पडल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला.

१० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर शनिवारी सकाळपर्यंत मुंबईतील विविध पाणवठ्यांमध्ये ३८,००० हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर शहरात काही ठिकाणी विसर्जन मिरवणुका सुरूच होत्या, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. गणेशमूर्ती विसर्जित करताना वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. संदीप चव्हाण, कार्तिक बलवीर, अथर्व वंजारी अशी तिघांची नावे असून देवळी येथे राकेश आव्हाड या तरुणाचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील सुपा आणि बेलवंडी येथेही दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघे बुडाले. जळगाव जिल्ह्यातही आणखी दोघांचा बुडून मृत्यू झाला.पुण्यातील ग्रामीण भागातही बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली. ठाणे येथील कोलबाड परिसरातील गणेशमंडपावर झाड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री विसर्जनाआधी आरती सुरू असताना मंडपावर झाड पडले, त्यात ५५ वर्षीय महिला मृत्युमुखी पडली.

रस्ते अपघातात चार जण ठार

गणपती विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांशिवाय रस्ते अपघातातही काही जणांना जीव गमवावा लागला. नागपूर शहरातील सक्करदरा भागात गणेश विसर्जनावेळी सक्करदरा पुलावर भीषण अपघात झाला, त्यात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. विनोद खापेकर (४०), लक्ष्मी खापेकर (६५), विवान खापेकर (४) आणि वेदांत खापेकर (८) अशी त्यांची नावे आहेत.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत