मुंबई

मुंबई ठाकरेंचीच! ठाकरे गटाला ३ जागा काँग्रेस, भाजप, शिंदे गटाला प्रत्येकी १ जागा

Swapnil S

मुंबई : मुंबईवर वर्चस्व कुणाचे याबाबत सर्वांनाच बरीच उत्सुकता होती. उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालातून अखेर मिळाले असून मुंबई ठाकरेंचीच यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईतील सहा मतदारसंघात मतमोजणीदरम्यान शेवटपर्यंत अटीतटीची लढत झाली. मुंबईत ठाकरे गटाला ३ जागा मिळाल्या, तर उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे विजयी झालेले अमोल कीर्तीकर फेरमतमोजणीत केवळ ४८ मतांनी पराभूत झाले. शिंदे गटाचे रवींद्र वायकर येथे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. भाजपला मुंबईत पियूष गोयल यांच्या रूपाने एकमेव जागा जिंकता आली.

मुंबई दक्षिणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, मुंबई दक्षिण-मध्य मध्ये अनिल देसाई व मुंबई उत्तर-पूर्वमधून संजय दिना पाटील हे विजयी झाले. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. तर मुंबई उत्तर-पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले आहेत. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे पियूष गोयल यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा ३ लाख ५७,६०८ मतांनी पराभव केला.

मुंबईत घवघवीत यश मिळविणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला ठाणे, कल्याणसह कोकण पट्ट्याने धक्का दिला आहे. ठाकरे गटासाठी सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नरेश म्हस्के, कल्याणमध्ये शिंदे गटाचे उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे विजयी झाले. पालघरमध्ये भाजपच्या डॉ. हेमंत सावरा यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळविला. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांची हॅटट्रिक रोखली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस