संग्रहित छायाचित्र
मुंबई

सहा तासांत ३०० मिमी पाऊस, सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर - मुख्यमंत्री

Swapnil S

मुंबई : रविवारी संध्याकाळपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने रात्रीनंतर चांगलाच जोर पकडला. पहाटेनंतर पावसाचा जोर वाढला आणि सहा तासांत मुंबईत ३०० मिमी पाऊस बरसला. कमी वेळेत जादा पाऊस बरसल्याने मुंबई पाण्याखाली गेली. मात्र भूमिगत पाण्याच्या टाक्या, रेल्वे हद्दीतील मायक्रोन टनेल यामुळे पाण्याचा निचरा वेळेत झाल्याने अधिक काळ पाणी साचून राहिले नाही. मुंबईकरांच्या सुरक्षेला प्राधान्य असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील पावसादरम्यानच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबई शहर जिल्हा पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, अभिजित बांगर, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर व व रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या नियंत्रण कक्षातून मुंबईतील विविध भागातील पावसाची माहिती घेतानाच महामार्ग, रेल्वे, प्रमुख रस्ते येथील परिस्थितीचा देखील आढावा घेतला. या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, "एरवी मुंबईत ६५ मिलिमीटर पाऊस झाला की अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. मात्र रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रेल्वे मार्ग आणि चुनाभट्टी, सायन या भागात पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महानगरपालिकेने पम्प बसविले आहेत. एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहनक्षमता तयार केली जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने जलसाठवण टाक्या तयार केल्यामुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंगसारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत आहे."

सकाळपासून रेल्वे, मुंबई महापालिका, राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई पोलिस आयुक्त यांच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेत होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईतील सुमारे ५ हजार ठिकाणांवर लक्ष !

मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. महानगरपालिकेचे अधिकारी फिल्डवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी नदीत टाकण्याची यंत्रणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सात ठिकाणी पम्पिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था