मुंबई

ठाणे शहराला होणार भातसा आणि बारवी धरणातून ५० दशलक्ष लिटर वाढीव पाण्याचा पुरवठा

प्रतिनिधी

ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून ५० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ४८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी पडतो. हे लक्षात घेऊन बारवी आणि भातसा धरणांतून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर याधरणातून शहराला १०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला होता.

जलसंपदा विभागाने अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कार्यवाही तात्काळ करावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

ठाणे मनपा बरोबर कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, उल्हासनगर मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत जलसंपदा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले. भातसा, नामपाडा, पोवाले, काळू आणि शाई या धरणांच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यासोबतच या धरणांच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

ठाणे महानगरपालिकेला मुंबई महानगरपालिकेकडून प्रक्रिया केलेले अतिरिक्त २० द.ल.लि. शुद्ध पाणी प्रतिदिन पाणी उपलब्ध करून द्यावे अशी अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली. यामुळे ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील कोपरी, आनंदनगर, किसननगर, भटवाडी व दिवा परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, नगरअभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत सोनाग्रा व इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ महायुतीवर नाराज? गिरीश महाजन भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

घर खरेदी करताय? 'या' ५ गोष्टींकडे द्या लक्ष, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

फक्त बॉलिवूडकरच नाही तर 'या' लोकांनीही लावली 'कान्स २०२४'ला हजेरी

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स