मुंबई : घाटकोपरच्या भावेश शेठ या ५८ वर्षांच्या व्यावसायिकाने सागरी सेतूवरून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. आर्थिक कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. त्यांच्या कारमध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नेांद करून तपास सुरु केला आहे. लवकरच शेठ यांच्या कुटुंबियांची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली जाणार आहे.
व्यवसासाने व्यावसायिक असलेले भावेश बुधवारी दुपारी आपल्या कारने वांद्रे-वरळी सागरी सेतूवर आले होते. सेतूवरून जात असताना अचानक त्यांनी कार थांबवली. मुलाला फोन केल्यानंतर त्यांनी कारमधून उतरून सागरी सेतूवरून समुद्रात उडी मारली. हा प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने पाहिल्यानंतर त्याने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. या माहितीनंतर वांद्रे पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तीन तास शोधमोहीम घेतल्यानंतर भावेश यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. भावेश हे काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते.
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होत असेल तर वरती दिलेल्या नंबर संपर्क करून मदत घेऊ शकता.