मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेत विदेशी सापांची एन्ट्री होणार असून त्यासाठी सर्पालय तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच सापांसाठी योग्य अधिवास निर्माण करण्यात येणार असल्याचे राणी बाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
राणीच्या बागेत वाघ, पेंग्विनसारख्या प्राण्यांची एन्ट्री झाल्यानंतर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. दरवर्षी लाखो पर्यटक हजेरी लावत असल्याने सुमारे १० कोटींच्या आसपास महसूल जमा होतो. मात्र, मागील वर्षात महसुलात अधिक भर पडली नाही. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि महसुलातील तूट भरून काढण्यासाठी नवीन सर्पालय तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी स्वदेशी प्रजातीच्या सापांसोबतच आता विदेशी प्रजातींचे १३ साप पर्यटकांना पाहता येणार आहेत. मात्र, यासाठीचा निधी प्रस्तावित असून त्याची तरतूद लवकरच होणार आहे, अशी माहिती त्रिपाठी यांनी दिली.
असे असणार सर्पालय
नवीन सर्पालय १६८०० चौरस फूट जागेवर तयार करण्यात येणार आहे. तेथे सापाच्या गरजेनुसार आवश्यक तापमान असेल. यातील काही सापांना अतिशय शीत वातावरण लागते, तर काही सापांना दमट वातावरणाची आवश्यकता असते. काही प्रजातींना उष्ण, तर काही प्रजातींना समशितोष्ण वातावरण लागते. त्या पद्धतीने हे सर्पालय तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा खर्च अद्याप निश्चित झाला नसून सल्लागाराकडून आराखडा तयार झाल्यानंतर त्या संदर्भात निविदा मागवण्यात येणार आहेत, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.
हे असणार विदेशी साप
सध्या पाणघोडा असलेल्या ठिकाणाच्या विरोधी बाजूला सध्याचे सर्प निवास आहे. हे सर्प निवास तोडून नव्याने सर्पालय तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी ट्रिंकेत संके, जॉन बॉ, रेड सॅड बॉ, व्हितकेर बॉ, रसेल वायपर, कॉमन इंडियन क्रेट, इंडियन रॉक पायथोन, चेकड किलबॅक, इंडियन कोब्रा बँडेड क्रेट, मॉनिटर लिझार्ड या विदेशी प्रजातींसह अजगर आणि धामण हे देशी साप सुद्धा या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत.
वर्षभरात २४ लाख पर्यटकांनी दिली भेट
राणीबाग येथे मागील वर्षभरात २४ लाख १७ हजार ३५७ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ९ कोटी ४९ लाख ३५ हजार ५१३ रुपयांच्या उत्पन्नाची भर पडली आहे.
कुटुंबासह बच्चेकंपनी तसेच देश विदेशातील पर्यटकांची राणीबागेत मोठी गर्दी झाली होते. शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी उद्यान व प्राणी संग्रहालय गजबजून जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत २४ लाख १७ हजार ३५७ पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.