विधानसभाध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची खेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते आणि भरत गोगावले यांची प्रतोद पद मान्य करण्यात आले. त्यामुळे आता व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. ती कारवाई टाळण्यासाठीच अविश्वासाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, आम्ही आज सभागृहात अध्यक्षांवरील विश्वासमत ठराव संमत केला आहे. त्यामुळे आपोआप अविश्वासाचा ठराव व्यपगत झाला आहे. त्यामुळे शिंदे-गोगावले यांचा व्हिप न पाळणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई शक्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. येत्या १८ जुलै रोजी विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. मात्र त्याच दिवशी राष्ट्रपतीपदाची निवडणूकही आहे. त्यामुळे ही तारीख एखाद दिवस पुढे ढकलता येईल का याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.