संग्रहित छायाचित्र
मुंबई

५० हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची अचूक कालगणना होणार; मुंबई विद्यापीठात भारतातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा कार्यान्वित

भारतातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा (एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री, एएमएस) आजपासून मुंबई विद्यापीठात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत आहे.

Swapnil S

मुंबई : भारतातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा (एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री, एएमएस) आजपासून मुंबई विद्यापीठात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत आहे. सुमारे २० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या अद्ययावत सुविधेमुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जात आहे. देशात कार्बन डेटिंगसाठी पहिले एक्सलरेटर सेंटर सुरु करण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठास मिळाला आहे.

देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विशेषतः विद्यापीठांमध्ये ही प्रगत सुविधा सुरु करणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. या प्रगत तंत्रज्ञान सुविधेची पहिली चाचणी आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, टीआयएफआरमधील प्राध्यापक एम.एन. वाहिया, एमयु एक्सलरेटर सेंटरच्या प्रमुख प्रा. वर्षा केळकर माने, डॉ. सिद्धार्थ कस्तुरीरंगन आणि डॉ. अभिजीत भोगले यांच्यासह चमुच्या उपस्थितीत करण्यात आली. मुंबई विद्यापीठात कार्यान्वित होत असलेल्या या सुविधेमुळे पुरातत्वशास्त्र आणि प्राचीन इतिहासाची उकल करण्यास हे केंद्र सज्ज असून ५० हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची अचूक नोंद घेऊन त्याची परीणामकारकता शोधून काढण्याची क्षमता या केंद्राकडे आहे. भारतातील अत्यंत प्राचीन संस्कृती आणि मानवनिर्मित साहित्य, पुरातन काळातील अनेक बाबींबरोबरच बायोमेडिकल आणि अणूऊर्जेच्या संशोधनात हे केंद्र महत्वाची भूमिका बजावणार आहे. मुंबई विद्यापीठातील या सुविधा फक्त पुरातत्त्वीय समुदायांच्या गरजा पूर्ण करणार नाही तर भूगर्भशास्त्र, वनस्पती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रा-बरोबरच इतिहासावर देशातील विविध भागांमध्ये परिमाणवाचक अभ्यासासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे.

मुंबई विद्यापीठातील या अद्ययावत कार्बन डेटिंग एक्सलरेटर सेंटर प्रकल्पाचे वैशिष्ट्ये म्हणजे या सुविधेचा लाभ फक्त मुंबई विद्यापीठापुरताच मर्यादीत न ठेवता या सुविधेचा लाभ सर्व भारतीय शास्त्रज्ञाना आणि उद्योगांना होणार आहे. मुंबई विद्यापीठाने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल असून भारतीय पुरातत्व समुदायाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. आजमितीस कार्बन डेटिंगसाठीचे नमुने हे परदेशात पाठविले जातात ज्यासाठी जवळपास ६०० डॉलर्स खर्च येतो. मुंबई विद्यापीठात या केंद्राच्या सहाय्याने आता पुरातत्व शास्त्राशी निगडीत गरजा भागविण्यासाठी मुंबई विद्यापीठ सज्ज होत आहे. सध्या जगात अशा ४५ मशीन कार्यान्वित असून युरोपमध्ये २२, अमेरिकेत ९, जपानमध्ये ८ मशीन आहेत.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video