पूनम पोळ/ मुंबई
मुंबईमध्ये दिवसागणिक अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे. पालिकेच्या वतीने कितीही उपाययोजना केल्या जात असल्या तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अंधेरी पश्चिम स्टेशन परिसरातील मोकळ्या जागांवर बस्तान मांडणाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एस. व्ही. रोड, अंधेरी स्टेशन परिसर, सीडी बर्फीवाला रोड, एन. दत्त अप्रोच रोड आदी ठिकाणांवरील रहदारीच्या जागा फेरीवाल्यांनी अडकवल्यामुळे इथल्या स्थानिकांना मात्र अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. पालिकेकडून कारवाई होत असली तरी ती तात्पुरती असून, साहेब लोक कडक आहेत, पण तेवढेच माणुसकी जपणारे आहेत. असे कौतुक करणारे शब्द इथल्या फेरीवाल्यांचे आहेत. यामुळे या परिसरातले फेरीवाल्यांवर होणारी कारवाई गांभीर्याने की दोन्ही बाजूंनी केलेला फार्स, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
निवडणुकीपूर्वी आमदार अमित साटम यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये अंधेरी पश्चिम येथील १४ ठिकाणे कायमस्वरूपी फेरीवालामुक्त करण्यासाठी सूचना केली होती. त्यानंतर पालिकेने या ठिकाणच्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. अंधेरी स्टेशन परिसर आणि जेपी रोडवर अनधिकृतपणे फेरीवाले आणि अतिक्रमण रोखण्यासाठी सतत देखरेख ठेवली जात होती. मात्र पालिका अधिकाऱ्यांच्या विशिष्ट वेळेनंतर या ठिकाणी फेरीवाले बस्तान मांडतात.
या गर्दीचा जास्त त्रास हा बाजूला असलेल्या बस डेपोमधून बाहेर येणाऱ्या बस प्रवाशांना होत असतो. गर्दीमुळे बसडेपो ते मुख्य रस्त्यावर येण्यासाठी ५ ते ७ मिनिटांचा वेळ लागतो. तसेच गर्दीमुळे गाडी वळवताना जास्त त्रास होत असल्याचे येथील बेस्ट बसचालकाने सांगितले. तर सर्वात जास्त त्रास हा रिक्षावाल्यांचा होत असून त्यांच्या नावाने कितीही ओरडले किंवा हॉर्न वाजवले तरी ते हटायला तयार नसतात. त्यातच, जराही धक्का लागला तर सारे रिक्षावाले भांडायला येतात, अशी कैफियत बस वाहकाने मांडली.
महापालिकेची गाडी साडेतीन चारच्या सुमारास येते. जर गाडी येणार असेल तर आम्हाला तिथला एक माणूस कळवतो. त्यानंतर आम्ही आमचा माल उचलतो. आणि सुरक्षित ठिकाणी ठेवतो. पालिकेची गाडी गेल्यावर अर्धा एक तासाने आम्ही पुन्हा धंदा लावतो, अशी माहिती या विभागात दुकान लावणाऱ्या घड्याळ विक्रेत्याने दिली.
२६ वर्षं जुने अनधिकृत दुकान
पालिकेची गाडी येणार असेल तर आम्हाला माहिती कळते आणि आम्ही आमचा माल लपवतो. पालिकेची माणसे कारवाई करतात आणि निघून जातात. यामुळेच आमचे दुकान २६ वर्षं एकाच ठिकाणी सुरू आहे. आम्हाला काहीसा त्रास होतो, पण आमचा धंदाही होतो. म्हणून आम्हाला या त्रासाचे दुःख होत नाही.
संध्याकाळी गर्दीच्या वेळेस स्टेशनपासून रस्त्यावर यायला १० ते १२ मिनिटे लागतात. पण येथे बसणारे सारे फेरीवाले गरीब आहेत. त्यांच्या या धंद्यावर त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहेत. त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही. आणि प्रवाशांकडून आम्हाला मीटरनुसार आमचे पैसे मिळतात. त्यामुळे आम्हाला फेरीवाल्यांकडून काही त्रास नाही.
- रिक्षावाला
या ठिकाणी फुटपाथवर जे फेरीवाले आहेत त्यांनी स्वतःच्या मेहनतीने जागा पकडली आहे. त्याना उठवण्याचा आम्हाला हक्क नाही. आमच्यात स्पर्धा जरी असली तरी ते आमच्या समुदायाच्या आहेत म्हणून आम्ही त्यांना अडवत नाही. आणि वाद हे प्रत्येक कामाच्या ठिकाणी होतात. म्हणून आम्ही इथल्या फेरीवाल्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही.
- स्टेशन नजीकचे दुकानदार
आम्ही फेरीवाल्यांवर कारवाई करायला जातो. तेव्हा ते झुंडीने आमच्या अंगावर धावून येतात. त्यांची मजल एवढी जाते. किंवा तेच लोक आम्हाला वरिष्ठांकडून फोन करतात. त्यामुळे आम्ही कारवाई करायचं म्हटल तरी करता येत नाही. शासकीय नियमानुसार ३ बाय ३ चे दुकान जरी मांडले असेल तर त्यांच्याकडून १२०० रुपये दंड आकारण्याचा नियम आहे.
- पोलीस हवालदार