मुंबई : एअर इंडियाचे ‘एआय-२७४४’ हे विमान सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना पावसामुळे धावपट्टीवरून घसरले. या दुर्घटनेत विमानाचे ३ टायर फुटले. हे विमान कोच्चीहून मुंबईला येत होते. या अनपेक्षित घटनेमुळे विमान काही क्षण अनियंत्रित झाले. पण वैमानिकाने प्रसंगावधान राखून त्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व विमान सुरक्षितपणे लँड झाले. सर्व प्रवासी व क्रू सदस्य सुखरूप आहेत.
विमानाचे ३ टायर फुटले
ही दुर्घटना सोमवारी सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी घडली. या घटनेत विमानाचे ३ टायर फुटले. यात मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी ०९/२७चे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे ती उड्डाणासाठी बंद करण्यात आली आहे. दुसरी धावपट्टी १४/३२ ही विमान वाहतूक सुरू ठेवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालया’चे (डीजीसीए) एक पथक करीत आहे.
एअर इंडियाने सांगितले की, विमानाला सुरक्षितपणे हँगरपर्यंत पोहोचवण्यात आले. सर्वच यात्री व क्रू सदस्यांना उतरवण्यात आले. विमानाला आता पुढील तपासणीसाठी ग्राऊंड करण्यात आले आहे. याप्रकरणी आवश्यक ती सुरक्षा तपासणी केली जात आहे.