मुंबई

विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले; मुंबई ग्राहक पंचायतीची दर नियंत्रणाची मागणी

मुंबई-दिल्ली विमान प्रवासासाठी १३ हजार ९०० तर लखनऊ-मुंबई प्रवासाला विमान कंपन्या २४ हजार ५०० रुपये आकारत असल्याची गंभीर तक्रार मुंबई ग्राहक पंचायतीने नागरी हवाई मंत्रालयाकडे आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे केली असून गगनाला भिडलेले दर कमी करण्याची आग्रही मागणी सुद्धा मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई-दिल्ली विमान प्रवासासाठी १३ हजार ९०० तर लखनऊ-मुंबई प्रवासाला विमान कंपन्या २४ हजार ५०० रुपये आकारत असल्याची गंभीर तक्रार मुंबई ग्राहक पंचायतीने नागरी हवाई मंत्रालयाकडे आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे केली असून गगनाला भिडलेले दर कमी करण्याची आग्रही मागणी सुद्धा मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.

दोन्ही संबंधित मंत्रालयांना लिहिलेल्या या पत्रात, मुंबई ग्राहक पंचायतीने उदाहरणादाखल मुंबई- दिल्ली-मुंबई, लखनऊ-मुंबई या मार्गावरील नजीकच्या काळातील प्रवासासाठी एअर इंडिया, इंडिगो, आकासा, स्पाइस जेट या विमान कंपन्यांचे दर उद्धृत केले असून ही वाढ दुपटी, तिपटीहूनही जास्त असल्याचे दाखवून दिले आहे. अनेकदा इंडिगोसारख्या बजेट एअर लाईन्स एअर इंडियापेक्षा जास्त दर आकारत असल्याचे सोदाहरण दाखवून दिले आहे. बजेट एअर लाईन्स म्हणून या एअर लाईन्स प्रवाशांकडून नाश्ता/खानपानासाठी वेगळी किंमतही वसूल करत असतात, असेही म्हटले आहे.

पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सणाचे आणि रजेचे दिवस हेरून विमान कंपन्या विमान प्रवासाचे दर वाढवून ग्राहकांची लूट करतात. ही नैमित्तिक दरवाढ असमर्थनीय असल्याचेही पंचायतीने म्हटले आहे. अशा एकतर्फी दरवाढीवर सरकारचे कोणतेच नियंत्रण नाही का, असा सवाल करत ही सरसकट अनुचित व्यापारी प्रथा असल्याने ती त्वरित रोखण्याची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने नागरी हवाई आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे केली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग १० पदरी होणार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अजितदादांनी जपली विचारधारा! तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले

बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी