मुंबई

वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या ‘एल क्लासिको’मध्ये कोणता संघ सरशी साधणार, याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष

प्रतिनिधी

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) महासत्ता. जेव्हा सर्वोत्तम संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा चाहत्यांना मनोरंजनाची पर्वणी मिळणे ठरलेलेच. स्पर्धेची अथवा दोन्ही संघांची गुणतालिकेतील स्थिती कशीही असली, तरी या दोघांमधील जुगलबंदी पाहण्यासाठी देशभरातील चाहते आतुर असतात. त्यामुळे गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर उभय संघांत रंगणाऱ्या ‘एल क्लासिको’मध्ये कोणता संघ सरशी साधणार, याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

फुटबॉलमध्ये ज्यावेळी रेयाल माद्रिद आणि बार्सिलोना हे दोन तोडीसतोड संघ आमनेसामने येतात, त्या लढतीला एल क्लासिको असे ओळखले जाते. त्याचप्रमाणे जवळपास गेल्या १० वर्षांपासून क्रिकेटमध्ये मुंबई-चेन्नई यांच्यातील सामन्यालाही तोच दर्जा चाहत्यांनी मिळवून दिला.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचे यंदाच्या हंगामातील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. मुंबईला चेन्नईविरुद्ध झालेल्या गेल्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईचा संघ पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघही गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानी असून बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना मुंबईला नमवणे अनिवार्य आहे. त्यामुळे वानखेडेवर गुरुवारी रसिकांना रोमहर्षक लढत पाहायला मिळणार, हे निश्चित.

बुमरापासून सावध

जसप्रीत बुमराने कोलकाताविरुद्ध काही दिवसांपूर्वीच झालेल्या सामन्यात पाच बळी पटकावले. त्याशिवाय चेन्नईविरुद्ध बुमराची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय झालेली आहे. त्यामुळे चेन्नईला बुमरापासून सावध राहावे लागेल. फलंदाजीत सूर्यकमार यादवची अनुपस्थिती मुंबईला प्रकर्षाने जाणवेल. त्यामुळे रोहित, इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्यापैकी एकाला डावाला आकार देण्याचे कार्य करावे लागेल.

जडेजाबाबत संभ्रम

अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चेन्नईच्या चिंतेत भर पडू शकते. फलंदाजीत डेवॉन कॉन्वे आणि अंबाती रायुडू चेन्नईसाठी सातत्याने योगदान देत आहेत. त्याशिवाय धोनीही उत्तम लयीत आहे. मुकेश चौधरी आणि महीष थिक्षणा चेन्नईच्या गोलंदाजी विभागाची धुरा वाहतील. ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा यांना कामगिरी उंचवण्याची गरज आहे.

Mumbai : शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज मेळावे; ठाकरेंचे षण्मुखानंदमध्ये, तर शिंदेंचे गोरेगाव नेस्को संकुलात शक्तिप्रदर्शन

पुढचे ‘लक्ष्य’: शरद पवार गट; आता राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ची शक्यता

Monsoon Update : पावसाचा मुहूर्त आता २२ जून

अखेर करार झाला, इराण युद्धाला विराम; डोनाल्ड ट्रम्प आणि मसूद पेझेश्कियान यांनी केल्या स्वाक्षऱ्या

मुंबई पालिकेत ठाकरे सेनेला धक्का; दीपक सावंत यांचे नगरसेवक पद रद्द, संख्याबळ ६५ वरून ६४ वर