प्रतिनिधी/मुंबई : जानेवारी अखेरपर्यंत महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप अंतिम होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. सध्या जागा कोणाकडे आहे, जागा कोणी लढवली तर कुणाला जास्त मते मिळतील, या मुद्द्यांचा जागावाटप करताना विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे, ते जाऊन भेटतात, इथेच संशय निर्माण होतो आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, अशी अपेक्षाही शरद पवारांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, “काँग्रेसकडे जास्त जागा आहेत. जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी ८-९ जागांवर लढण्याची चर्चा होऊ शकते. महाराष्ट्रात मविआमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे, ही आमची भूमिका आहे. इंडिया आघाडीमधील सर्व घटक पक्षांनी एकत्रित आगामी निवडणुकांना सामोरे जावे. प्राथमिक बैठकांत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते पुढे बैठका घेतील. सध्या इंडिया आघाडीमध्ये सर्व पक्षांची एकमेकांशी सुसंगत अशी भूमिका घेण्याची तयारी आहे.”
ईडीच्या धाडींबद्दल पवार म्हणाले की, “केंद्र सरकार बदलत नाही, तोवर अशा धाडी पडतच राहणार. विरोधातील पक्षातील नेत्यांवर कारवाई होतच राहणार आहे. आमदार रोहित पवार, आमदार रवींद्र वायकर यांच्या संदर्भातदेखील असेच होत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई करण्यात आली. सरळ असे दिसतेय की, सत्ताधारी पक्षावर कारवाई होत नाही.”
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. त्याबद्दल विचारले असता, “ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे, ते जाऊन भेटतात इथेच संशय निर्माण होतो आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे,” असे शरद पवार म्हणाले.
कार्यकाळ असेपर्यंत कार्य करत राहणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाबद्दल टिप्पणी केली होती. त्याबद्दल विचारले असता शरद पवार यांनी अजित पवारांना जशास तसे उत्तर दिले. “त्यांनी काय बोलावे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेबद्दलचा असेल तर, अनेक लोकांची उदाहरणे देता येऊ शकतात. मोरारजी देसाई पंतप्रधान होते, तेव्हा त्यांचे वय ८३ होते. त्यांच्या मागे जनतेचे बहुमत होते. त्यामुळे अशा वय वगैरे गोष्टी काढू नयेत. जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत जनतेची सेवा करणे आणि सहकाऱ्यांना मदत करणे हे माझे काम आहे. त्यामुळे ते मी करत राहीन. मी निवडणूक लढणार नाही, हे जाहीरपणे सांगितले आहे. राज्यसभेची माझी एक-दोनच वर्षे राहिली आहेत. ती अर्धवट सोडू का? मला लोकांनी संसदेत पाठवले आहे. त्यामुळे कार्यकाळ असेपर्यंत काम करत राहणार आहे,” असेही पवार यांनी स्पष्ट केले.