शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East bypolls) आज मतदान होत आहे. महाराष्टात झालेल्या सत्तांतरानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रथमच 'मशाल' या निवडणूक चिन्हावर लढत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाला मतदारांचा कसा कौल मिळतो, याबाबतची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Andheri East bypolls) ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. परंतु, असे असले तरीही ऋतुजा लटके यांच्यासमोर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार नसला तरी भाजपचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार चालवल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. त्यामुळे या निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला.
दरम्यान, अंधेरी पूर्व मतदारसंघात ३८ मतदान केंद्रांवर मतदान होईल. मतदानासाठी एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदार पात्र आहेत. मतदान पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडावे म्हणून प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.