Mumbai : मेट्रो स्टेशनवर आता झोपण्याची सोय; अंधेरी मेट्रो स्थानकात देशातील पहिली स्लीप पॉड सेवा सुरू प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : मेट्रो स्टेशनवर आता झोपण्याची सोय; अंधेरी मेट्रो स्थानकात देशातील पहिली स्लीप पॉड सेवा सुरू

मुंबई मेट्रोच्या जाळ्यात प्रथमच प्रवाशांना स्थानकातच विश्रांती घेण्याची, ताजेतवाने होण्याची आणि रात्रीच्या मुक्कामाची सुविधा उपलब्ध होणार आहे. अंधेरी वेस्ट मेट्रो स्थानकात खासगी ‘स्लीप पॉड्स’ असलेले एक आधुनिक ‘कॅप्सूल हॉटेल’ लवकरच सुरू केले जाणार आहे.

Swapnil S

स्वीटी भागवत/मुंबई

मुंबई मेट्रोच्या जाळ्यात प्रथमच प्रवाशांना स्थानकातच विश्रांती घेण्याची, ताजेतवाने होण्याची आणि रात्रीच्या मुक्कामाची सुविधा उपलब्ध होणार आहे. अंधेरी वेस्ट मेट्रो स्थानकात खासगी ‘स्लीप पॉड्स’ असलेले एक आधुनिक ‘कॅप्सूल हॉटेल’ लवकरच सुरू केले जाणार आहे.

‘स्नूझ हाऊस’ नावाने ओळखली जाणारी ही सुविधा मेट्रो लाईन्स २-अ स्थानकामध्ये विकसित केली जात असून, त्यामुळे शहराचा हा गजबजलेला वाहतूक साखळीचा टप्पा आता प्रवाशांसाठी बहुउपयोगी केंद्र बनणार आहे. यात खासगी स्लीप पॉड्सव्यतिरिक्त गरम पाण्याचे शॉवर, को-वर्किंग लाऊंज आणि २४ तास सेवा देणारे स्वागत कक्ष (रिसेप्शन) असेल. यामुळे नोकरदार, व्यावसायिक, पर्यटक आणि प्रवासात असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्रवाशांना मेट्रो प्लॅटफॉर्मपासून अवघ्या काही पावलांवर थोड्या वेळेच्या विश्रांतीसाठी किंवा रात्रभराच्या मुक्कामासाठी चेक-इन करता येईल. लांब पल्ल्याचे प्रवासी, रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी आणि पुढील प्रवासाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

अंधेरी पश्चिम हे मुंबईतील सर्वात गजबजलेल्या मेट्रो इंटरचेंज ठिकाणांपैकी एक आहे. दहिसर ते अंधेरी दरम्यान धावणाऱ्या मेट्रो लाईन्स २-अ च्या मार्गावर दररोज ३.५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात आणि हे स्थानक मेट्रो लाईन-१ ला थेट जोडलेले आहे. तसेच, अनेक देशांतर्गत व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे केंद्र असलेल्या अंधेरीतील व्यावसायिक भागात जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची सेवा हे स्थानक करते.

मेट्रो स्थानकांना केवळ वाहतुकीचे साधन न ठेवता किरकोळ विक्री, खानपान आणि प्रवासी सुविधा देणारे एकात्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे.

बेकरी केंद्र तसेच कॉफी आऊटलेटही

कॅप्सूल हॉटेलसोबतच या स्थानकात ‘फरदून’ हे इराणी-पारशी बेकरी केंद्र सुरू होणार असून, तेथे बन मस्का, मावा केक आणि ताज्या पेयांसारखे मुंबईचे आवडते खाद्यपदार्थ मिळतील. तसेच भारतीय शेतातून आलेल्या कॉफी बीन्सचा वापर करणारे ‘शी’ हे विशेष कॉफी आऊटलेटही तेथे असेल. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे यापूर्वीच स्लीप पॉड्स सुरू करण्यात आले असले, तरी मुंबई मेट्रोच्या जाळ्यात स्थानकामध्येच उभारली जाणारी ही पहिलीच सुविधा ठरेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा; विधेयक राज्यसभेत मंजूर

जन्ममृत्यू नोंदींबाबत नवे सुधारणा ‌विधेयक

मुंबईत पावसाचा जोर वाढणार! ठाणे, रायगड, पालघरमध्ये कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील विक्रम मोडणार

दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; मेट्रो स्थानकांमध्ये शिरलं पाणी, रस्तेही जलमय

शाळांजवळ ५० मीटरच्या परिसरात 'जंक फूड' विक्री बंद; कठोर कारवाईचा FDA चा इशारा