मुंबई : अंधेरी पश्चिम येथील प्रथमेश हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील मुंबईचे माजी उपमहापौर व भाजपा नेते अरुण देव यांच्या बी/११०२ फ्लॅटमध्ये मंगळवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास फटाक्यामुळे भीषण आग लागली. रॉकेट थेट बाल्कनीमध्ये घुसल्याने एसी यूनिटला आग लागली.
फटाक्यांमधील रॉकेट त्यांच्या फ्लॅटच्या बेडरूमच्या बाल्कनीवर आदळले आणि त्याच ठिकाणी ठेवलेल्या एसी यूनिटला आग लागली. या आगीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकला होता, परंतु, वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठे नुकसान टळले.
आग विझवण्यासाठी सुरक्षारक्षक आणि शेजाऱ्यांनी तत्काळ मदत केली. या घटनेमुळे, सोसायटीमध्ये फटाक्यांच्या वापराबाबत कडक नियमांची आवश्यकता उभी राहिली आहे. सामाजिक दृष्टिकोनातून, फटाक्यांच्या वापरासाठी कडक नियम करून त्यात फटाक्यांचे प्रकार आणि वापराच्या वेळेची मर्यादा ठरवण्यात यावी. मध्यरात्री १०.३० नंतर फटाक्यांचे वापर थांबवावे. धोकादायक फटाक्यांचे वापर पूर्णपणे बंद करावे. नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सोसायटीत एक अधिकारी नियुक्त करावा. धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी तातडीच्या कारवाईची मागणी देव यांनी केली आहे. अशी घटना टाळण्यासाठी सर्व सोसायटी सदस्यांनी यावर गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.