मुंबई

मुंबईत धक्कादायक प्रकार! अँटॉप हिलमध्ये पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरून वाद, १५ वर्षीय मुलावर चाकूहल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लिफ्टजवळ थांबले असताना त्यांचे शेजारी लक्ष्मी डिक्का यांच्या नातेवाईक मुलावर त्यांचा कुत्रा भुंकला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेला किरकोळ वाद थेट हाणामारीत बदलला. गुरुवारी (दि. ८) राज हाइट्स टॉवर इमारतीत ही घटना घडली. या हल्ल्यात एका १५ वर्षीय मुलासह कुटुंबातील अनेक जण जखमी झाले आहेत.

कुत्र्याच्या भुंकण्यावरून शाब्दिक वाद

एफआयआरनुसार, तक्रारदार नरेश उदयभान बिडलान (वय ४७), हे बीएमसीमध्ये सफाई कर्मचारी आहेत. ते पत्नी वंदना आणि पुतण्या आर्यन कागड्रा (१५) यांच्यासोबत रात्री १०.३० वाजता पाळीव कुत्र्याला फिरवून घरी जात होते. लिफ्टजवळ थांबले असताना त्यांचे शेजारी लक्ष्मी डिक्का यांच्या नातेवाईक मुलावर त्यांचा कुत्रा भुंकला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

लाकडी काठीने मारहाण

बिडलान यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात आली. परिस्थिती शांत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच नितीन डिक्का (वय २५) घटनास्थळी आला आणि त्याने लाकडी काठीने बिडलान यांना मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

संपूर्ण इमारतीत दहशतीचे वातावरण

एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, संजना नावाच्या एका महिलेनेही बांबूच्या काठीने बिडलान यांच्या डोक्यावर प्रहार केला. याच वेळी अमन आणि तुषार यांनी आर्यनला मारहाण केली, तर जमावातील एका अज्ञात व्यक्तीने आर्यनच्या पाठीवर आणि हातावर चाकूने वार केला. या गोंधळात बिडलान यांची पत्नी वंदना यांनाही मारहाण करण्यात आली. झटापटीदरम्यान त्यांचे मंगळसूत्र तुटून हरवले. शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, नितीन डिक्काने बांबूची काठी दाखवत त्यांना धमकावले. त्यामुळे संपूर्ण इमारतीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अँटॉप हिल पोलिसांनी नितीन डिक्का, तुषार, सविता, अमन, कविता आणि शरणजीत यांच्यासह काही अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि फौजदारी कायदा दुरुस्ती कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती