मुंबई : वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला कित्येक एकर भूखंड उपलब्ध होणार आहे. या भूखंडावर घरे उभारून किंवा आहे त्या स्थितीत भूखंडाची विक्री करण्याबाबतचा आणि वित्तीय सहाय्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने रिअल इस्टेट सल्लागार असलेल्या सीबीआरई या कंपनीची नेमणूक केली आहे. ही एजन्सी खासगी कंपन्यांसोबत चर्चा करून बीडीडी पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्याचे पर्याय सुचविणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारने म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून निवड केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून म्हाडाने नायगाव येथील बीबीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम एल अँड टी कंपनीला दिले आहे. ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या कामासाठी शहापूरजी अँड पालनजी तर वरळी बीबीडीचे काम टाटा कंपनीला दिले आहे. तिन्ही ठिकाणी रहिवाशांच्या पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. पुनर्वसन इमारतीसोबतच तिन्ही प्रकल्पाच्या ठिकाणी विक्री घटकाच्या घरांचे कामही करण्यात येणार आहे.
निधी उभारणीला सहाय्य करणार
प्रकल्पासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी म्हाडा विक्री घटकातील घरांची विक्री करून त्यामधून महसूल जमा करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार म्हाडाने विक्री घटकांचे धोरण बनविण्यासाठी रिअल इस्टेट सल्लागाराची यापूर्वी नेमणूक केली होती. मात्र संबंधित कंपनीकडून म्हाडाला सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे मंडळाने पुन्हा वरळी, नायगाव, ना. म. जोशी येथील घरे कशा पद्धतीने विक्री करायची याबाबत सल्लागाराची नेमणूक केली आहे. ही कंपनी बीडीडीच्या पुनर्विकासातून म्हाडाला उपलब्ध होणारी घरे अथवा जमिनीची कोणत्या दराने विक्री करावी, प्रकल्पासाठी लागणारा निधी कसा उभारावा, याबाबत मंडळाला सल्ला देणार आहे.