मुंबई : बोगस सोन्याचे दागिने तारण ठेवून एका नामांकित बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी रमाकांत दिनकर भाटले या आरोपीला पाच महिन्यानंतर ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अनिलकुमार करणसिंग बलियान हे हे एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून कामाला असून सध्या त्यांची नेमणूक जोगेश्वरीतील शाखेत आहे. ऑक्टोबर २०२० रोजी रमाकांत भाटलेने बँकेतून व्यवसायासाठी गोल्ड लोनसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्याला बँकेने ५ लाख ६२ हजार रुपयांचे गोल्ड लोन दिले होते. त्यापैकी ७० हजार ३०२ रुपयांचा हप्ता त्याने बँकेत भरला, मात्र नंतर त्याने कर्जाचे हप्ते भरणे बंद केले होते. त्याने सादर केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी ते सर्व दागिने बोगस असल्याचे उघडकीस आले होते.