प्रवाशांचे हाल सुरूच; 'मेस्मा' अंतर्गत नोटीस जारी, बेस्ट कर्मचारी संपावर ठाम, 'नीट'च्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्याची मागणी 
मुंबई

प्रवाशांचे हाल सुरूच; 'मेस्मा' अंतर्गत नोटीस जारी, बेस्ट कर्मचारी संपावर ठाम, 'नीट'च्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्याची मागणी

सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने शनिवारी २,६७६ पैकी एकही बस रस्त्यावर उतरली नाही.

Swapnil S

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने शनिवारी २,६७६ पैकी एकही बस रस्त्यावर उतरली नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले व तारेवरची कसरत करत त्यांना इच्छित स्थळ गाठावे लागले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील मिनिट्सना बगल देण्यात आल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.

कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसल्याने 'मेस्मा' अंतर्गत कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी 'नीट'ची परीक्षा असून कर्मचाऱ्यांची मुलेही परीक्षा देणार आहेत. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

मध्यस्थी करत तोडगा काढावा, असे आवाहन बेस्ट कामगार कृती समितीचे निमंत्रक अॅड. आंबोणकर यांनी केले आहे. उदय 'बेस्ट'चा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करणे, स्वमालकीच्या पाच हजार बसेसचा ताफा दाखल करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवार १८ जूनच्या मध्यरात्रीपासून संपाचे हत्यार उपसले आहे. शनिवार हा संपाचा दुसरा दिवस होता व संपावर काहीच तोडगा न निघाल्याने संप सुरुच राहिल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सरकारला सोयरसुतक नसल्याचा संताप

बेस्ट उपक्रमातील कंत्राटी व कायमस्वरुपी कामगारांनी संप पुकारला असून दोन दिवस झाले काहीच तोडगा निघालेला नाही. बेस्ट, मुंबई महापालिका अन् राज्य सरकार हे या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने मुंबईकर आणि बेस्ट उपक्रमाचे त्यांना काही सोयरसुतक नसल्याचा संताप मुंबईकरांनी व्यक्त केला आहे. बेस्टच्या संपामुळे शनिवारीही शहरातील रस्त्यांवरून एकही बस धावली नाही. त्यामुळे संप १०० टक्के यशस्वी करण्यावर कर्मचारी ठाम आहेत. मात्र या संपाचा सामान्य नागरिकांना, प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. संपामुळे सामान्यांची चांगलीच कोंडी झाली. शहरातील सर्वच रेल्वे स्थानकांच्या बाहेर बेस्ट बसेस उपलब्ध नसल्याने रिक्षा, टॅक्सी पकडण्यासाठी प्रवासी धावपळ करत होते. तर बेस्टच्या संपाचा फायदा घेत काही रिक्षा-टॅक्सीचालकांनी जादा पैसे आकारल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

नीट परीक्षार्थांसाठी 'एसटी'च्या बसेस

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) १०० बसगाड्या उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. तसेच मुंबईतील नीट परीक्षेच्या ६३ परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत ६० अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आलेली असून याबाबत आगार व्यवस्थापकांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच संपाचा कोणताही विपरीत परिणाम उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागावर झालेला नसून विद्युत पुरवठ्याची अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू आहे.

संपाने प्रवासी संतप्त

मुंबईत दररोज २५ लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. कामावर जाण्यासाठी, शाळा, महाविद्यालयांत जाण्यासाठी बेस्ट बसचा वापर केला जातो. शाळा, महाविद्यालये नुकतीच सुरू झाली आहेत. बसने कार्यालयात जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र रस्त्यावरून बेस्ट बसेसच गायब असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकार जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत बेस्टचा हा संप सुरूच राहणार आहे. एकही बस रस्त्यावर धावू देणार नसल्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

शिंदेंच्या नेतृत्वाखालील एकच शिवसेना अस्तित्वात; 'व्होट बँक 'वरून अमित शहांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

विनातिकीट प्रवास; किमान ५०० रुपये दंड, रेल्वेकडून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरु

टॅक्सी, रिक्षा परवान्यांच्या कागदपत्रांची राज्यव्यापी पडताळणी सुरू; राज्य सरकारचा निर्णय

सहा खासदारांना ठाकरे गटाची नोटीस

परभणीत सभामंडप कोसळून ६ जणांचा मृत्यू