मुंबई

भांडुपकरांना मिळणार मुबलक पाणी, नवीन जलवाहिन्यांसाठी पालिका ९ कोटी ३६ लाख खर्च करणार

Swapnil S

मुंबई : भांडुप पूर्वेकडील वीर सावरकर मार्गावरील एम्. डी. केणी मार्ग संगमपासून ते रेल्वे मार्ग क्रॉसिंगपर्यंत नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. ६०० ते ९०० मीमी व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार असून, यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९ कोटी ३६ लाख ७२ हजार रुपये खर्च करणार आहे. जल वाहिन्या जुन्या झाल्या असून, वारंवार पाणी गळती व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. भांडुप पूर्वेकडील वीर सावरकर मार्गावर भांडुप रेल्वे स्टेशन जवळ ६०० मी.मी. व ९०० मी.मी. व्यासाच्या जलवाहिन्या वळवणे, बदलणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच भांडुप पूर्वेकडील एम. डी. केणी मार्ग संगम पासून ते रेल्वे मार्ग क्रॉसिंग पर्यंत ६०० मी.मी. व्यासाची मुख्य जलवाहीनी बदलणे, वळवणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच परिमंडळ- पाच व परिमंडळ - सहामध्ये पायाभूत सुविधांच्या कामांमुळे अनपेक्षित येणाऱ्या तात्काळ स्वरुपाच्या मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकणे, बदलणे व वळवणे अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी बुधवारी निविदा मागवण्यात आल्या असून, पात्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या जल कामे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईला १२० किमी अंतरावरून सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणी जलवाहिन्याद्वारे मुंबईतील विविध भागात पुरवठा करण्यात येतो; मात्र मुंबईतील जल वाहिन्या ब्रिटीशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस