छेडछाडीचा वाद : ११ जण पडले खड्ड्यात; एकाचा मृत्यू, भांडुपमध्ये SRAच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना 
मुंबई

छेडछाडीचा वाद : ११ जण पडले खड्ड्यात; एकाचा मृत्यू, भांडुपमध्ये SRAच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना

भांडुप पश्चिम जनता मार्केट येथे ‘एसआरए’च्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी २३ एप्रिल रोजी रात्रीच्या अंधारात अचानक ११ जण या प्रकल्पासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात कोसळले.

Swapnil S

मुंबई : भांडुप पश्चिम जनता मार्केट येथे ‘एसआरए’च्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी २३ एप्रिल रोजी रात्रीच्या अंधारात अचानक ११ जण या प्रकल्पासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात कोसळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून भालचंद्र फाळे (२५) यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर १० जण जखमी झालेत.

एका मुलीला ‘हाय’ केल्यामुळे सुरू झालेला वाद थेट भीषण अपघातात बदलल्याची ही धक्कादायक घटना आहे. घटनेच्या वेळी लग्न उरकून काही वऱ्हाडी हॉलच्या बाहेर गप्पा मारत उभे होते. त्याच दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या तिघांपैकी एका युवकाने वऱ्हाडातील एका मुलीला हात दाखवत ‘हाय’ केले. यावरून वाद चिघळताच तिघांनी पळ काढला आणि जवळच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ते शिरले. त्यांना पकडण्यासाठी वऱ्हाडीही पळाले. त्यादरम्यान एक जण बेसमेंटमध्ये कोसळला. त्याला पाहण्यासाठी बांधकाम साइटवरील कर्मचारी व अन्य वऱ्हाडी हे एका तात्पुरत्या उभारलेल्या प्लॅटफॉर्मवर चढताच प्लॅटफॉर्मच कोसळला आणि वऱ्हाडी थेट २० फूट खोल खड्ड्यात पडल्याची खळबळजनक घटना गुरूवारी रात्री उशीरा घडली.

या घटनेत लग्नातील ८ व्यक्ती व तीन बांधकाम कामगार असे एकूण ९ जखमी झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात भालचंद्र गणेश फाळे (२५) याचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत १० जण जखमी झाले असून जखमींवर सिटी केअर व अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खड्ड्यात पडलेल्या ११ जणांना बाहेर काढून तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. इतर जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

मुलीची छेड काढण्यावरून झाला वाद

भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वाअकराच्या सुमारास काका पेट्रोल पंप येथील मातेश्वरी हॉलमागील बाजूस सुरू असलेल्या लग्न समारंभात एका मुलीची छेड काढण्यावरून वाद झाला. छेड काढणाऱ्या अनोळखी मुलाला पकडण्यासाठी काही जण त्याच्या मागे गेले, तर भालचंद्र फाळे हा श्रद्धा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग येथे ग्राऊंड फ्लोअरवरून दुसरीकडे गेला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या मागे लग्नातील काही जण गेले. तेथे एका लाकडी फळीने तसेच पत्र्याने झाकलेल्या बांधकामाधीन साइटवरील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची टाकी होती.

प्लॅटफॉर्म तुटून सगळेच खाली कोसळले

सदर व्यक्ती तिकडे गेली असता लग्नाला आलेल्यांपैकी एक जण त्याला शोधताना या टॅंकसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला. त्याला ‘एसटीपी टॅंक’मधून बाहेर काढण्यासाठी आणखीन काही जण गेले. ते ज्या प्लॅटफॉर्मवर उभे होते तो तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आला होता. त्यावर एकाच वेळी जास्त जण उभे राहिल्याने तो प्लॅटफॉर्म तुटून सगळेजण खाली कोसळले.

भांडुपच्या घटनेतील जखमींची नावे

श्रेयस सुर्वे (२५) – प्रकृती स्थिर, अनिकेत कदम (२६) – डिस्चार्ज, जयदीप शाह (२१) – डिस्चार्ज, संकेत जुवटकर (२५) – डिस्चार्ज, आदित्य आहेर (२६) – डिस्चार्ज, अनिकेत महेश पाटील (२०) – डिस्चार्ज, अंकित कुमार रोहित (१९) – डिस्चार्ज, यवंत फरसाणे (३१) – डिस्चार्ज, मण यादव (२६) – डिस्चार्ज. अन्य एक जण अग्रवाल रुग्णालयात दाखल असून त्याचे नाव हरीशंकर कर्वा (४३) असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे बांधकाम ठिकाणी असलेल्या सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्याभोवती पुरेशी बॅरिकेडिंग किंवा धोक्याच्या सूचना देणारे फलक होते का, याचा तपास आता पोलीस आणि संबंधित प्रशासन करत आहे. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, बिल्डर किंवा कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असे संकेत दिले आहेत.

मानखुर्द येथे भंगाराच्या गोदामाला आग; एक जखमी

दरम्यान, मानखुर्द मंडाला येथे भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत शाहरुख खान (२५) हे ४० ते ४५ टक्के भाजले असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मानखुर्द येथील मंडाळा परिसरात जी.एम. लिंक रोडलगत एकता नगरमधील भंगाराच्या गोदामाल शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग ५०० बाय ५०० चौरस फूट परिसरापर्यत पसरली. या घटनेत विद्युत वायरिंग, एलपीजी सिलिंडर, टारपोलिन शीट, ५० ते ६० तेलाचे ड्रम, लाकडी प्लायवूड, ए.सी. शीट, स्टील शीट जळून खाक झाले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८.४० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

‘आप’मध्ये मोठी फूट; राघव चढ्ढा यांच्यासह सात खासदार भाजपमध्ये जाणार

पुरुषी दांभिकता आणि स्त्रियांचे दास्यत्व

आजचे राशिभविष्य, २५ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

उन्हाळ्यातील खास डिश! आंबट-तिखट कैरी राईस; एकदा खाऊन बघाच

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 'हे' ५ पदार्थ खा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला