भाईंंदर : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून काशीमीरा नाका ते मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ९ शी सुसंगत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पूल वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच काँक्रीटच्या पृष्ठभागावर लांबच लांब भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.
याप्रकरणी स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गो ग्रीन फाऊंडेशन ट्रस्टने केली आहे. उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुले झालेले नसतानाच पीसीसी आणि काँक्रिटच्या पृष्ठभागावर भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, निर्धारित थरांची जाडी आणि तांत्रिक निकषांचे पालन झाले आहे का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बांधकामात मुरूम, सोलिंगचे दगड, जीएबीआय, पीसीसी आणि पीक्यूसी या विविध थरांचे साहित्य योग्य प्रमाणात वापरण्यात आले आहे का, याबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जागेवरील मोजमाप, काँक्रिट कोअर टेस्ट, थरांची जाडी, साहित्याची प्रयोगशाळेतील तपासणी आणि काँक्रिटची ताकद यांची स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत पडताळणी करावी, अशी मागणी ट्रस्टने केली आहे.
अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी
प्रकल्पासाठी नियुक्त गुणवत्ता तपासणी यंत्रणा, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि संबंधित अभियंत्यांच्या कामकाजाचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बांधकामात त्रुटी असताना गुणवत्ता तपासणी अहवाल कसे तयार झाले, याची पडताळणी करावी. दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. तसेच संबंधित कंत्राटदार आणि सल्लागार कंपन्यांना काळ्या यादीत टाकून अनियमित देयकांची तपासणी करावी, अशी भूमिका ट्रस्टने मांडली आहे.
सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय पूल खुला करू नका
पुलावरील भेगांचे स्वतंत्र तांत्रिक परीक्षण करून आवश्यक दुरुस्ती पूर्ण करावी. सक्षम तज्ज्ञांकडून सुरक्षिततेचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय पूल वाहतुकीसाठी खुला करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, नगरविकास विभाग, दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय गो ग्रीन फाऊंडेशन ट्रस्टने घेतला आहे. केवळ चौकशीचे आश्वासन न देता दोषींवर प्रत्यक्ष कारवाई करावी, असा इशाराही ट्रस्टच्या वतीने देण्यात आला आहे.